नियम मोडणाऱ्या हॉटेल, पबसह लग्न सोहळय़ावर कारवाई

पुन्हा वाढणारा कोरोना रोखण्यासाठी पालिकेने नियमांच्या कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली असून हॉटेल, पब, नाईट क्लब, रेस्टॉरंटसह कार्यक्रम-लग्न सोहळ्यातही नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. चेंबूर पश्चिम येथे रविवारी आयोजित लग्न सोहळ्यात 350 हून जास्त जणांची गर्दी आणि मास्कचा वापर केला नसल्याचे आढळल्यामुळे वधूच्या भावासह आयोजकांवर टिळकनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच नरीमन पॉईंट येथील जिमखान्यावरही अशाच प्रकरणी कारवाई होणार आहे.

कोरोना वाढत असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी 50 पेक्षा जास्त जणांनी गर्दी करू नये आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून पालिकेकडून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. मात्र चेंबूर छेडा नगर जिमखान्यात 21 फेब्रुवारी रोजी आयोजित लग्नसोहळ्यात 300 ते 350 जणांची गर्दी आढळली. या प्रकाराची माहिती मिळताच पालिकेने या ठिकाणी संध्याकाळी धाड टाकली. या जिमखान्याचे बुकिंग वधूचा भाऊ सनी साबळे याने केले होते. त्याच बरोबर मॅनेजर रजनीकांत कदम, सेक्रेटरी सी. डी. बिस्त आणि केटरर्स मालक अशोक रोहित यांच्यावरही टिळक नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नरीमन पॉईंट येथील वुडस्टॉक जिमखान्यातही शनिवारी झालेल्या सोहळ्यातही नियमापेक्षा जास्त माणसे जमा झाल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार लग्नसोहळ्यांना 50 पेक्षा जास्त वऱहाडी जमण्यास मनाई आहे. ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. मात्र गेल्या दोन आठवडय़ांपासून कोरोना पुन्हा वाढू लागल्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अंधेरीत 3 पबवर कारवाई

अंधेरी अॅमेस्थिस्ट या क्लबवर महानगरपालिकेने 12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजल्यानंतर धाड टाकली होती. यावेळी मोठी गर्दी याठिकाणी आढळली. गर्दी असूनही ग्राहकांबरोबरच कर्मचाऱ्यांनीही मास्क लावले नव्हते. या प्रकरणात आंबोली पालीस ठाण्यात मॅनेजर सुशांत जाबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय अरबर पब आणि एल्युशन पबमध्येही कोरोना खबरदारीचे नियम मोडल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या