चेन्नई प्लेऑफच्या उंबरठय़ावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीची प्लेऑफची धाकधूक आणखी वाढली आहे. चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव करत आयपीएलच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा आणखी बळकट केल्या तर दिल्लीसाठी प्लेऑफ प्रवेश आणखी कठीण झाला आहे. दिल्लीसाठी पुढील तिन्ही सामन्यांत विजय अनिवार्य आहेच. सोबत आघाडीवर असलेल्या संघांचा पराभवही त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. ते पराभूत झाले नाही तर दिल्लीचे आव्हान आपोआपच संपेल.

आयपीएलचा सोळावा मोसम अधिकच थरारक झाला आहे. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असली तरी अद्याप एकाही संघाचा ना प्लेऑफ प्रवेश निश्चित झाला आहे, ना एकाही संघाचे अधिकृतरीया आव्हान संपलेय. आज धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांच्या सहा फलंदाजांच्या विशीतल्या खेळीने चेन्नईला 20 षटकांत 8 बाद 167 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती.

चेन्नईचे 168 धावांचे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पेलवलेच नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने निराशा केल्यामुळे दिल्लीला कुणी वालीच सापडला नाही. चेन्नईने पहिल्या पॉवरप्लेमध्येच आपली पॉवर दाखवत सामन्याला आपल्या नियंत्रणाखाली आणले.  दीपक चहरने पहिल्या दोन षटकांत वॉर्नर (0) आणि फिल सॉल्ट (17) या सलामीच्या जोडीला डगआऊटमध्ये धाडले. त्यातच मिचेल मार्श धावचीत झाला आणि तेथेच दिल्ली संघ खचला.

तीन धक्क्यानंतर मनीष पांडे (27) आणि रिली रोसोने (35) चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागी रचत दिल्लीचे आव्हान जिवंत ठेवण्याचे प्रयत्न केले. पण दोघेही 5 धावांच्या अंतराने बाद झाले आणि दिल्लीसाठी विजयाचा पाठलाग करणे कठीण होऊन बसले. शेवटच्या 5 षटकांत 76 धावांचे अवघड लक्ष्य दिल्लीला गाठायचे होते, पण ते त्यांच्या फलंदाजांना शक्य झाले नाही. त्यांना एकाही षटकात 15-20 धावा काढता आल्या नाही आणि त्यांचा संघ सामना संपण्याआधीच पराभूत झाला. पथिराणाने 37 धावांत 3 विकेट टिपत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.