छगन भुजबळ हे पनवती! जरांगे यांची टीका

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निघालेले मंत्री छगन भुजबळ यांना गुरुवारी मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करण्याचे भुजबळांनी ठरवले होते. हे कळताच मराठा संघटनांनी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार नाशिकमधील येवला मतदारसंघात मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत भुजबळांचे स्वागत करण्यात आली. यावेळी ‘छगन भुजबळ गो बॅक’, अशी तुफान घोषणाबाजीही करण्यात आली. भुजबळांच्या या पाहणी दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे. ही टीका करत असताना जरांगे यांनी भुजबळ हे ‘पनवती’ आहे असे म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की जो शेतकऱ्यांच्या, लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो. अशा लोकांनी शेतात जायला नको पाहिजे. उगाच त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनवती असल्यासारखा आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भुजबळांनी करून काय उपयोग आहे असा सवाल जरांगे यांनी विचारला आहे. पंचनामे करण्याचे काम हे प्रशासनाचे असते, भुजबळ शेतात पंचनामे करायला गेले होते का ? प्रशासनाने पंचनामे करून तातडीने अहवाल द्यावा आणि शेतकरी वाचवावा.

छगन भुजबळ यांचा ताफा गुरुवारी सकाळच्या सुमारास सोमठाण देश या गावात दाखल झाला होता. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या भुजबळांचा मराठा आंदोलकांनी विरोध केला. आंदोलकांनी भुजबळांना यावेळी काळे झेंडे दाखवले. लासलगावातील कोटमगावातही भुजबळांना मराठा समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला. येथे मराठा समाजाने भुजबळांचा ताफा अडवला आणि काळे झेंडे दाखवत ‘छगन भुजबळ गो बॅक’च्या घोषणा दिल्या.