संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची झाडाझुडपातून मुक्तता!

1834

‘मोहीम फत्ते होणार नव्हती तर, हाती का घेतली ?’ असा प्रश्न संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे अपूर्णावस्थेतील स्मारक पाहून प्रत्येक इतिहासप्रेमीला पडला आहे. या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभानंतर सुरू झालेले दुर्दैवाचे फेरे आज 32 वर्षांनंतरही संपलेले नाहीत. संभाजी राजांचे भव्यदिव्य स्मारक उभारायचे हा हेतू निश्चितच अभिमानास्पद होता, मात्र जिद्द आणि चिकाटीचा अभाव असल्याने 65 लाखांपेक्षा अधिक निधी खर्च होऊनही हे स्मारक कुलूपबंद स्थितीत आहे.

या स्मारक इमारतीला झाडाझुडपांनी पूर्णतः वेढलं होतं. अखेरीस संगमेश्वर येथील संभाजी प्रेमी युवक परशुराम पवार यांनी धामणी येथील युवकांना मदतीला घेऊन स्मारकाचा सर्व परिसर दिवसभर राबून श्रमदानाने स्वच्छ केला. संभाजी प्रेमी युवकांच्या या सेवा कार्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मात्र दरवर्षी स्मारक झाडाझुडपांनी वेढलं जाणार आणि आम्ही त्याची साफसफाई करणार, हा संतापजनक प्रकार स्मारक समिती थांबवणार कधी असा सवाल पर्शुराम पवार यांनी उपस्थित केला आहे.

इतिहास प्रेमी तसेच पर्यटक यांची मागणी लक्षात घेऊन 11 मार्च 1986 साली मुंबई गोवा महामार्गावर संभाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारावं म्हणून भूमीपूजन करण्यात आलं. या स्मारकात ग्रंथालय, संभाजी महाराजांच्या जीवनावरील तैलचित्र, म्युरल, अर्धप्रतिमा आदि गोष्टींचे नियोजन करण्यात आले. या स्मारक कल्पनेने रत्नागिरी जिल्हावासीय नव्हे तर संपूर्ण कोकणवासीयांमध्ये उत्साह संचारला. भूमिपूजन झाल्यानंतर स्मारकाचं काम त्वरेने सुरु होइल अशी अपेक्षा होती मात्र तीन वर्षे काम सुरु होण्यात गेली. त्यानंतर सुरु झालेले काम 1992 साली सात फुटांपर्यंत भिंतींचं बांधकाम झाल्यावर निधी अभावी रखडले ते अनेक वर्षे तसेच होते. या दरम्यान इमारतीला झाडाझुडूपांनी पूर्णपणे व्यापून टाकलं. स्मारकाच कांम निधी अभावी रखडल्याने सामनाने याबाबत सातत्याने लक्ष वेधलं. यानंतर शासकीय निधीचा ओघ सुरु झाला. आराखड्यात बदल करण्यात आला.यानंतर काम सुरु व्हायचं निधी संपल्यावर बंद पडायचं. विविध लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घातलं. परत निधीचा ओघ सुरु झाला. जिल्हा नियोजन मंडळानेही भरीव निधी दिला. सर्व मिळून जवळपास 65 लाखांपेक्षा अधिक निधी खर्च झाला असला तरी या स्मारकाची दुर्दशा अद्याप संपलेली नाही. बांधकाम विभागाने दर्जाची तमा न बाळगता काम करुन घेतलं आणि असंच दर्जाहीन स्मारक समितीकडे हस्तांतरीत केलं.

संभाजी स्मारकाची इमारत पूर्ण झाली मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने ही इमारत प्रेमीयुगुलांचे, मद्यपींचे, गर्दुल्यांचे आडोशाचं ठिकाण बनलं. स्मारकासाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीचा हा असा वापर होवू लागल्याने संगमेश्वर येथील संभाजी प्रेमी युवकांनी परशुराम पवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय यंत्रणेसह पोलीस यंत्रणेचं लक्ष वेधलं. एवढ्यावरच न थांबता परशुराम पवार यांनी स्वत: खर्च करून सर्व परिसराची साफसफाई करत स्मारकस्थळी विद्युत रोषणाई करून शाहीरांच्या पोवाड्याचा कार्यक्रमही केला होता. यानंतरही स्मारक समिती मार्फत कोणतेही खास प्रयत्न झाले नाहीत. पावसाळ्यात स्मारकाला दरवर्षी झाडं झुडपे आणि वेली वेढतात आणि पावसाळ्यानंतर संभाजीप्रेमी स्मारकाची साफसफाई करतात. हा प्रकार संभाजी प्रेमींनी अजून किती वर्ष सहन करायचा ? असा सवाल परशुराम पवार यांनी उपस्थित केला आहे. नुकतीच पवार यांनी स्मारकाची पाहणी केली आणि स्मारकाची दुरवस्था पाहून त्यांचा संताप अनावर झाला. अखेरीस धामणी येथील तरुण विनोद मेस्त्री, निनाद सुतार, आदित्य धामणाक, शुभम जोगले, अक्षय मेस्त्री, सिध्देश पालांडे, साहिल मेस्त्री, वैष्णव सुतार, समीर जोगले, प्रसाद मेस्त्री, संदेश जोगले, परेश जोगले, विराज मेस्त्री, अनिकेत पांचाळ आदींना सोबत घेऊन दिवसभर श्रमदान केले आणि सायंकाळ पर्यंत स्मारक जाळ्या आणि वेलीतून मुक्त करुन संभाजी प्रेमींना दिलासा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या