छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी जागा हस्तांतरणाबाबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे आपला महाराष्ट्र ओळखला जातो. त्यामुळे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मारके होत आहेत. तसेच कोल्हापुरातही ऐतिहासिक छत्रपती शाहू मिल परिसरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी जागा हस्तांतरणाबाबत श्रद्धेचा विषय आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,’ अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री एकनाथ शिंदे हे महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिकांसंदर्भात आढावा बैठकीसाठी आज जिल्हा दौऱयावर आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजीत पाटील, योगेश जाधव, महेश जाधव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महापालिकेच्या वतीने पूर्णत्वास येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम निधीअभावी रखडले आहे. त्यासाठी आठ कोटींचा निधी नगरविकास खात्याकडून देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रात सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून ‘युनिफाइड डीसीआर’ ही सर्वसमावेशक नियंत्रण असलेली नियमावली तयार करून राज्य सरकारने क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. यातून बांधकाम क्षेत्रातील गैरवापराला आळा बसणार आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. तसेच बांधकामासह कृषी आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळून राज्याच्या विकासाची गतीही वाढणार आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भात मुंबईसह इतरत्र माहिती देणे सुरू असून, जेथे अडचणी येतात, तेथे राज्य सरकारकडून मार्गदर्शन सुरू असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर शहराच्या विकासाला चालना देणारे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यानुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू. यासाठी शासनाकडे फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी आयुक्त कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

नगरविकासमंत्री प्रथमच मनपात

एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी सभागृहात बैठक घेतली. महानगरपालिकेचा कारभार या विभागाशी जोडला गेला आहे. गेल्या 42 वर्षांत एकदाही या खात्याच्या मंत्र्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला भेट दिली नव्हती. मात्र, एकनाथ शिंदे हे पहिले नगरविकासमंत्री ठरले आहेत.