श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना शाहूनगरीचा अखेरचा मुजरा, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती राजघराण्याचे 12वे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष व राजघराण्याचा भक्कम आधारवड, कुशल मार्गदर्शक व मनोमिलनाचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय 75) यांच्या निधनाने अवघा सातारा जिल्हा सुन्न झाला आहे. शोकाकुल वातावरणात संगम माहुली येथील राजघाटावर शिवाजीराजे भोसले यांच्यावर बुधवारी दुपारी पावणेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

छत्रपती राजघराण्यातील बाराव्या पिढीचे सदस्य, साताऱयाचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पुणे येथे निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अदालतवाडा येथे आणण्यात आले. रात्री अकरापासूनच त्यांच्या अंत्यदर्शनाला सातारकरांनी अदालतवाडा येथे गर्दी केली. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी वृषालीराजे भोसले, शिवाजीराजे भोसले यांचे नातू कौस्तुभादित्य पवार, राजमाता कल्पनाराजे भोसले, कोल्हापूरचे शाहू महाराज, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सत्यजितसिंह गायकवाड, वेदांतीकाराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, आमदार शशिकांत शिंदे, आनंदराव पाटील, सत्यजित पाटणकर, किशोर शिंदे, उद्योजक फरोख कूपर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेतले.

दुपारी दीड वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून शिवाजीराजे भोसले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी सातारकरांनी शिवाजीराजे भोसले यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. संगम माऊली येथे राजघाटावर राजकारणातील सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर चिरंजीव कौस्तुभादित्य यांनी आजोबांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. राजघराण्याशी संबंधित असणाऱया पंचकुळी सदस्यांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पाडण्यात आला.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.