
विजापूर जिल्ह्यातील दंडकारण्य विशेष विभागीय समितीशी (DKSZC) संबंधित 25 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये 12 महिलांचा समावेश आहे. या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर एकूण 1.47 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणासोबतच सुरक्षा दलांनी जप्ती मोहीम राबवली. यामध्ये 14.06 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली. या मालमत्तेमध्ये 2.90 कोटी रुपयांची रोकड आणि 11.16 कोटी रुपये किंमतीचे 7.20 किलो सोने याचा समावेश आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विजापूरमधील या कारवाईदरम्यान, एलएमजी, एके-47, एसएलआर आणि इन्सास रायफल्ससह एकूण 93 स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या मते, नक्षलवादी या शस्त्रांचा वापर परिसरात दहशत, खंडणी आणि हिंसाचार पसरवण्यासाठी करत होते.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सायपीसी मंगल कोर्सा उर्फ मोटू, सायपीसी आकाश उर्फ फागू उइका, डीव्हीसीएम शंकर मुचाकी आणि एसीएम पाले कुर्सम यांसारख्या प्रमुख माओवादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी., सीआरपीएफचे डीआयजी बी.एस. नेगी आणि विजापूरचे एसपी डॉ. जितेंद्र कुमार यादव यांच्यासह वरिष्ठ पोलीस, सीआरपीएफ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण झाले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सायपीसी, डीव्हीसीएम, पीपीसीएम, एसीएम यांसारख्या संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे.




























































