कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जात असताना या शेतकऱ्याला एका भरधाव गाडीने उडवले होते. ज्या गाडीने या शेतकऱ्याला उडवले ती गाडी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा मुलगा चिदानंद सवदी याची आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-50 वर कुडाळसंगमा चौकाजवळ हा अपघात झाला होता. अपघाताचे ठिकाण हे हुनगुंड शहराजवळ आहे. या अपघातात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याचं नाव कुदलप्पा बोळी (58 वर्षे) असं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की एमजी कंपनीची ग्लॉस्टर ही गाडी भरधाव वेगात होती. ही गाडी अथनीहून बेळगांवकडे चालली होती. कुदलप्पा बोळी हे शेतातील कामं आटोपून घरी चालले असताना त्यांची दुचाकी सवदी यांच्या गाडीने उडवली होती. पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर यांनी इंडीयन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की कुदलप्पा यांचा मुलगा हनुमंत (31 वर्षे) याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सगळ्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेतले आहे.
कुदलप्पा बोळी यांचा जावई मंगलप्पा याने आरोप केला आहे की जेव्हा हा अपघात झाला तेव्हा चिदानंद सवदी हा गाडी चालवत होता. अपघात झाल्यानंतर कुदलप्पा ही जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यांना चिदानंद किंवा त्यांच्यासोबत असलेल्यांनी वैद्यकीय मदत मिळवून देण्यसाठी काहीही हालचाल केली नाही असा आरोपही मंगलप्पा यांनी केला आहे. हा अपघात पाहून तिथे जमा झालेल्यांना मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करायचं नाही असं चिदानंद याने धमकावल्याचं मंगलप्पाने म्हटलंय.
चिदानंद याने मंगलप्पा यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. ज्या गाडीमुळे अपघात झाला ती गाडी माझी आहे, हे खरं असलं तरी मी गाडी चालवत नव्हतो असं चिदानंद याने म्हटलं आहे. ही गाडी माझा चालक चालवत होता असं चिदानंद याने सांगितलं आहे. मी माझ्या मित्रांसोबत घरी परतत असताना ही घटना घडली होती आणि मी मित्रांसोबत दुसऱ्या कारमध्ये होतो असं चिदानंदचं म्हणणं आहे. आमची गाडी चालक चालवत असलेल्या माझ्या गाडीच्या बरीच पुढे होती असा दावाचिदानंद यांनी केला आहे. . अपघाताबाबत कळताच मी जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी धावपळ केल्याचंही चिदानंद याचं म्हणणं आहे. मंगलप्पाने केलेले आरोप आणि चिदानंद याने केलेले दावे याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की घटनेचा तपास सुरू असून आम्ही अजून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीये.





























































