ज्ञानाचा वारसा नवख्या वकिलांना द्या! सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे ज्येष्ठ वकिलांना आवाहन

आपली न्यायव्यवस्था ही समानता, परस्पर आदरभाव आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे न्यायची आहे. या प्रक्रियेत ज्येष्ठ वकिलांनी आपल्याकडील ज्ञानाचा वारसा नवख्या वकिलांना द्यावा, असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्ताने उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या वतीने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे ‘न्यायाधीश आणि वकील यांच्यातील परस्पर संबंध’ या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते. याप्रसंगी न्या. अभय ओक, न्या. दीपंकर दत्ता, न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय, न्या. प्रसन्न वराळे, न्या. संजय गंगापूरवाला, न्या. रवींद्र घुगे, अ‍ॅडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ, बार असोसिएशनचे एन.सी. जाधव, सचिव आर.के. इंगोले यांची उपस्थिती होती. आपल्या विद्वत्ताप्रचूर भाषणाच्या सुरुवातीला न्या. चंद्रचूड यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांचा परस्पर संबंध उलगडून सांगितला.

देशाची न्यायव्यवस्था आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सदृढ होऊ पाहात आहे. समानता, परस्पर आदरभाव हे या प्रक्रियेतील दोन अतिशय महत्त्वाचे पैलू आहेत. तिसरा पैलू तंत्रज्ञानाचा असून न्यायाधीश आणि वकिलांनी दोघांनीही त्याचा साकल्याने उपयोग करून न्यायव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे, असे ते म्हणाले. न्या. चंद्रचूड यांनी ई-फायलिंगवरही भर दिला. न्यायव्यवस्थेत आता नवीन पिढी पुढे येत आहे. त्यांना ज्येष्ठांनी अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्येष्ठ वकिलांनी आपल्या ज्ञानाचा वारसा नवख्यांकडे द्यावा, त्यांना कायद्यात प्रवीण करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आता काळ बदलत आहे. न्यायव्यवस्थेत महिलांना अधिक संधी मिळाली पाहिजे, किंबहुना महिलांना समान संधी देणे हे न्यायव्यवस्थेसमोरील आव्हान असल्याचे न्या. चंद्रचूड म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. चैतन्य धारूरकर यांनी केले.