मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये खडाजंगी, युतीत फूट पडल्याच्या चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभेत सोमवारी मुख्यंमत्री नीतिश कुमार आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्यात खडाजंगी झाली. या वादानंतर राज्यात जदयू आणि भाजपा युतीत फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बिहार विधानसभेत सोमवारी लखीसराय येथे घडलेल्या एका घटनेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी गृहखात्याचे प्रभारी बिजेंद्र प्रसाद यादव यांना विचारणा केली. 10 फेब्रुवारी रोजी लखीसराय येथे डीएसपी रँकचा एक अधिकारी आणि दोन स्टेशन हाऊस अधिकाऱ्यांनी सिन्हा यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्याप्रकरणी पोलीस चौकशी करत असून सदनाची विशेषाधिकार समिती देखील तपास करत आहे.

यावेळी बिजेंद्र यादव यांन सदनात लखीसराय येथे गुन्ह्यांच्या वाढीसंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर दिलं. त्या वर भाजपचे सदस्य संजय सरावगी यांनी सिन्हा यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणात अद्याप कारवाई पूर्ण न झाल्याचं सांगितलं. त्यावर अध्यक्ष सिन्हा यांनी यादव यांच्याकडे दोन दिवसात पुन्हा या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितलं.

यानंतर मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा मुद्दा वारंवार सदनात चर्चेसाठी का आणला जातो? पोलिसांचा अहवाल पाहून सदनाची विशेषाधिकार समिती आपलं मत मांडेल आणि मग निर्णय होईल. तोपर्यंत हा मुद्दा वारंवार उपस्थित का केला जात आहे? जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा पोलीस तपास करतात आणि अहवाल कोर्टाकडे सोपवला जातो. त्या पुढचं काम कोर्टाचं असतं. पोलिसांचा अहवाल हा सदनाच्या चर्चेचा विषय होऊ शकतो का? सदनाला हा अहवाल पाहून त्यावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? लोकशाहीच्या प्रत्येक घटकाला त्याच्या संवैधानिक मर्यादा दिलेल्या आहेत आणि त्याने त्याचं उल्लंघन न करणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही सरकारी कामात हस्तक्षेप करू नका, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तर त्यावर उत्तर देताना सिन्हा यांनी आधी कुमार यांना समजवण्याच प्रयत्न केला. मात्र त्यांचाही पारा चढला आणि त्यांनी नीतिश यांना सुनावलं. ते म्हणाले की, तुम्ही नेहमी सांगता की तुमचं सरकार न्यायासोबत विकास करतं. पण मी या सदनाचा संरक्षक आहे आणि माझंही काम सदनाच्या प्रतिष्ठा राखणं हे आहे, असं सिन्हा यावेळी म्हणाले.