कुस्तीसाठी भाजप उतरला तर स्पर्धेआधी धाडी टाकतील!! शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या आणि त्यात भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल, असा सणसणीत ‘धोबीपछाड’ टाकत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला अक्षरशः अस्मान दाखवले. ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकणाऱया कोल्हापूरकर पृथ्वीराज पाटीलचे अभिनंदन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुस्तीचा संदर्भ देत भाजपला अक्षरशः लोळवले. ते म्हणाले, ‘समोरून वार करण्याची हिंमत यांच्यात नाही. मर्दाने मर्दासारखे लढले पाहिजे आणि मर्दाने कसे लढायचे हे कोल्हापूरच्या मातीतून शिकले पाहिजे.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ ऑनलाइन जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या खोटेपणाचा, बेगडी हिंदुत्वाचा बुरखा तर फाडलाच, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचाही ‘ठाकरी’ भाषेत समाचार घेतला.

‘जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं… कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडले असे नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही,’ असा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

‘2014 ला युती आम्ही तोडली नव्हती’

आज आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, तुमचा भगवा खरा आमचा खोटा असे म्हणता, पण 2014 ला युती आम्ही तोडली नव्हती.  शेवटचा दिवस असताना मला एकनाथ खडसेंचा फोन आला. आपलं काही जुळेल असे वाटत नाही, वेगवेगळं लढलेलं बरं असं ते म्हणाले. जागावाटप होत आलेलं, पण अचानक असं काय घडलं? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावेळीही आमच्या हाती भगवा होता. तुम्ही युती तोडली आणि स्वतंत्र लढलो. शिवसेना ही समोरून वार करते, पाठून वार करत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

कर्तृत्व सांगण्यासारखे नसल्याने द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करताहेत

‘कोल्हापूर हे काय माझ्यासाठी नवीन नाही. माझे आजोबा आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध काय होते हे वेळोवेळी मीदेखील सांगितलं आहे आणि शिवसेनाप्रमुखांनीही सांगितलेलं आहे, त्यामुळे आमची एक नाळ जोडलेली आहे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे काल जे कोणी येऊन गेले, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ही सभा नक्कीच घेतलेली नाही. पण बऱयाचदा असे होते की आपल्याकडे काही बोलायचे मुद्दे नसले की, मग विरोधकांवर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं कुठे काही घोडं पुढे सरकतं का हे बघायचं. ही यांची एक वाईट सवय झाली आहे. स्वतःच्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काही नसल्याने द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि आपलं ईप्सित साध्य करायचे,’ असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

पहिले सिलिंडर दिले, आता काय कोरोना पळवायला रिकामे सिलिंडर वाजवायचे?

 देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांना रेशन दिलं. रेशन दिलं, पण ते शिजवायचं की कच्चं खायचं. गॅसच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. आदिवासी क्षेत्रात गेलं तर त्यांचंही तेच म्हणणं आहे, पहिलं सिलिंडर मिळालं, पण दुसरं भरताना कशी तारांबळ उडतेय ते कोण पाहायला आलं. पहिलं सिलिंडर दिलं, आता काय कोरोना पळवायला रिकामं सिलिंडर वाजवायचा का?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

आम्ही दर कमी करायचे आणि तुम्ही वाढवत जायचे

गॅसच्या किमती भरमसाट वाढल्या, फडणवीस कालच्या सभेत यावर बोलले का? ‘रेशन दिले ते जनतेच्या पैशातूनच दिले, तुमच्या पैशातून नाही. विक्रांतच्या पैशातून तुमचं रेशन भरलं आणि दिलेलं रेशन शिजवायचं कसं हे सांगत नाही. भाजपशासित राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. या सरकारनेपण केले असते तर पेट्रोल स्वस्त मिळाले असते, असे ते म्हणाले. आम्ही पैसे कमी करायचे, तुम्ही वाढवत जायचे. दुसरीकडे आमच्या जीएसटीचीही रक्कम द्यायची नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

भाजपच्या नकली हिंदुत्वाचा, भगव्याचा बुरखा फाडायलाच हवा!

भाजपच्या नकली हिंदुत्वाचा, भगव्याचा बुरखा फाडायलाच हवा. भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलोय, असे सांगताय, पण तुमचा भगवा कोणता भगवा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या बाजूला हिरवा लावाल, निळा लावाल, पिवळा, काळा लावाल तो भगवा म्हणाल तो भगवा आम्ही मानणार नाही. तुमचा भगवा हा भगवा नाहीच. अस्सल भगवा हा शिवरायांचा, साधुसंतांचा आणि वारकऱयांचा भगवा आहे. ज्याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाही. हाच आमचा भगवा आहे. हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा ठरवायला लागलात. एक गोष्ट लक्षात ठेवा शिवसेना 1966 साली जन्माला आली. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेने ना कधी आपला झेंडा बदलला, विचार बदलला, ना नेता बदलला. आजही आमच्या मनात आणि होर्डिंगवरही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही विचार आणि नेता आणि रंग आमच्याकडे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच

फडणवीस यांनी कोल्हापूरच्या ताराराणी चौकात पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असायचा आता सोनियाजींचा फोटो असतो अशी टीका केली होती. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचा जन्म होण्याआधी जेव्हा जनसंघ होता तेव्हाचा तुमचा झेंडा आठवा. त्यानंतर तुम्ही गेलात जनता पक्षात, त्यानंतर बाहेर पडून भारतीय जनता पक्ष. त्याआधी तुमची वाटचाल होती गांधीवादी, समाजवादी. मग शिवसेनाप्रमुखांनी भगवी दिशा दाखवली तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की या दिशेने गेले की दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो मग तुम्ही हिंदुत्वावर आलात. आजही आमच्या होर्डिंगवर शिवसेनाप्रमुख आहेत, पण तुमच्या किती होर्डिंगवर अटलजी आणि आडवाणी आहेत? आडवाणी यांनी ही भगवी दिशा दाखवली, पण कुठे आहेत आडवाणी? सरपंचपदालाही एकच फोटो आणि पंतप्रधानपदालाही एकच फोटो, दुसरे फोटो गेले कुठे? आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच, कोणत्या पदासाठी ही व्यक्ती उभी आहे?, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या बेगडीपणाचा समाचार घेतला.

भगव्याच्या रक्षणाच्या गोष्टी करता आणि कर्नाटकात भगवा तुडवला जाताना गप्प बसता?

भगव्याच्या रक्षणाच्या ज्या गोष्टी करताहात, मग आमच्या बाजूला जो कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे तिथल्या मराठी माणसाच्या हातातील भगवा तुडवला जातोय, मराठी माणूस बडवला जातोय तिथे एकतरी तुमचा भाजपचा कार्यकर्ता त्या कानडी अत्याचाराविरोधात शिवसैनिकासोबत रस्त्यावर उतरला आहे का? असा सवाल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या ज्या वेळी तिथल्या मराठी माणसावर अत्याचार झाले त्यावेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरला, पण भाजपचा एकही कार्यकर्ता उतरलेला नाही. फक्त बोलायचे, पण एकही जण रस्त्यावर दिसला नाही.

कोल्हापूरवरचा हिंदुत्वाचा ठसा पुसू देणार नाही

दिल्लीहून छत्रपतींचे स्वराज्य गिळायला आलेल्या औरंगजेबाला छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येनंतर पराक्रमी ताराराणी यांनी जिंकू दिले नाही. औरंगजेबाला मराठी मातीत गाडून टाकला हा आपला इतिहास आहे. सतेज पाटील म्हणाले, रात्र वैऱयाची आहे, रात्र कितीही वैऱयाची असो, घाबरण्याचे कारण नाही. कारण मर्द जिथे एकवटतात तिथे वैऱयाचा दिवस जरी असला तरी दिवसा त्याला काळोख दाखवण्याची हिंमत आपल्यात आहे. जे कोणी म्हणताहेत कोल्हापूरवरचा भगवा पुसला जाईल त्यांना मी वचन देतो की, कोल्हापूरवरचा हिंदुत्वाचा भगवा ठसा मी पुसू देणार नाही, अशी ग्वाही देताना सर्व शिवसैनिक आणि तिन्ही पक्षांतील सहकाऱयांनी एकत्र मिळून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

…तर शिवसेनाप्रमुखांच्या नावासमोर जनाब लावण्याचा नीच प्रयत्न का केलात?

शिवसेनाप्रमुखांविषयी तुम्हाला एवढं प्रेम वाटत आहे तर तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब पदवी लावण्याचा नीच प्रयत्न केलात. तुमचं एवढं त्यांच्यावर प्रेम आहे तर त्याच हिंदुहृदयसम्राटांच्या खोलीत… आम्ही मंदिर मानतो त्या खोलीत अमित शहांनी मला दिलेलं वचन का मोडलंत याचं उत्तर का नाही देत. तसेच नवी मुंबई एअरपोर्टला हिंदुहृदयसम्राटाचं नाव देतोय, त्याला तुमचा विरोध का आहे? हा जो समृद्धी महामार्ग आहे तो तुम्ही नुसता रस्ता बनवत होतात, त्या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा आम्ही मेमध्ये सुरू करतोय. त्या रस्त्यालासुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारने दिले, तुम्ही दिलेले नाही. तुमच्यासोबत असताना तुमच्याकडे मागणी करूनसुद्धा तुम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचे मोठेपण दाखवले नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

खोटे बोलण्यात कमी पडलो तरी खोटे बोलणार नाही, ते आमच्या रक्तात नाही!

‘निवडणूक म्हटल्यानंतर एक वेगळा असा माहोल तयार होतो आणि अनेकदा आपल्याला असं वाटतं की जे खोटं रेटून बोलत आहेत, ते रेटून बोलत असल्यामुळेच ते खरंय की काय? मध्यंतरी आपल्या आमदारांची बैठक छगन भुजबळ यांच्या घरी झाली होती आणि तिथे मी बोललो होतो की महाविकास आघाडी यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेच. आम्ही उघडपणे सगळं करत आहोत, लपूनछपून नाही. आम्ही कमी कुठे पडतो? कामात पडतोय का, तर अजिबातच नाही. आपत्ती आली तर धावून जायला कमी पडतोय का? अजिबातच नाही. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींमध्येही कमी पडत नाही. तरी कमी कुठे पडतो तर खोटे बोलण्यात कमी पडतो, पण आम्ही खोटं बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल, पण आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

ना भाषेचा, ना शिवरायांचा, ना भगव्याचा अभिमान अशी धेंडे लादताहेत

कोल्हापूरचे जुने पालकमंत्री त्याच्याबद्दल कोल्हापूरकरांनीच सांगायला हवं. ते मूळचे कोल्हापूरचे आहेत असे म्हणतात. आता पुण्यात गेलेत. जिथे जाईन तिथलाच होतो मी असे आहेत ते. कोल्हापुरात गेले कोल्हापूरचा, पुण्यात गेले पुण्याचा, मंत्री असताना ते कर्नाटकात गेले तेव्हा तिथेही कानडीत बोलले. त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ होता ‘जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्येच.’ ही अशी धेंडं तुम्ही आमच्यावर लादलीत, ना त्यांना राज्याचा अभिमान ना भाषेचा, ना शिवरायांचा ना भगव्याचा अभिमान. ही  अशी तुमची अवलाद आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा अभिमान शिकवणार.

युती असतानाही भाजपची मतं शिवसेनेला का मिळाली नाहीत? त्यावेळी तुमची मते काँग्रेसच्या पारडय़ात फिरवलीत का? भाजपच्या मतानुसार काँग्रेसला मतदान करणं पाप असेल तर मेहबुबा मुफ्तीसोबत जाणं पुण्य होतं का?’

बनावट हिंदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला

देशामध्ये भाजपने एक बनावट हिंदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला. लोकांनी झिडकारलं. हिंदुहृदयसम्राट म्हटल्यानंतर नाव आणि चेहरा एकच येतो तो म्हणजे  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरे कोणतेही नाव येत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते होऊ शकत नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा तोच हिंदुहृदयसम्राट होऊ शकतो. त्यावेळी घरी बसून नंतर प्रेससमोर येऊन प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुहृदयसम्राट होऊ शकत नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

या प्रश्नांची उत्तरे आहेत का?

  • हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रेम असेल तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला?
  • नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्यास भाजपचा विरोध का?
  • भाजपच्या झेंडय़ावर, पोस्टरवर अटलजी, आडवाणींचा फोटो का दिसत नाही?
  • बेळगावमधील मराठी माणसांसाठी भाजपचं कुणीरस्त्यावर उतरलं का?

 आम्ही कमी कुठे पडतो? कामात पडतोय का, तर अजिबातच नाही. आपत्ती आली तर धावून जायला कमी पडतोय का? अजिबातच नाही. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींमध्येही कमी पडत नाही. तरी कमी कुठे पडतो तर खोटे बोलण्यात कमी पडतो, पण आम्ही खोटं बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही.