चिखलीच्या रेणुका देवीची वहन मिरवणूक एकवीस तासांनी संपन्न

चिखलीच्या रेणुका देवीची वहन मिरवणूक तब्बल एकवीस तास चालली. मंगळवारी रात्री सात वाजता सुरु झालेली वहन मिरवणूक बुधवारी दुपारी चार वाजता रेणुका मातेच्या मंदिरासमोर महाआरती होवून समाप्त झाली.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीची चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. यावर्षी सुद्धा सकाळी वगदी प्रदक्षिणा, मानाचे पातळ, त्रिशूलधारी मिरवणूक यासह अभिषेक पुजाअर्चा विविध धार्मिक कार्यक्रमाची दिवसभर रेलचेल होती. व्याघ्र रूढ अशी अष्टभुजा रूपातील भव्य मूर्तीची वहन मिरवणूक मंगळवारी रात्री सात वाजता काढण्यात आली. या यात्रेचे वहन मिरवणूक हे प्रमुख वैशिष्ट्य असते. यामध्ये वहनोत्सवात सनई चौघडा, बँड पथक, ढोलताशे, नगारे, टाळमृदंगासह भजनी मंडळ, वाघ्या मुरळींचा समावेश होता. बारुदखाना फोडण्यात येतो हे सुद्धा प्रमुख आकर्षण या मिरवणुकीचे होते.

मंदिरातून निघालेल्या देवीच्या वहन मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली . रेवड्यांची उधळण देवीवर होताना जागोजागी दिसत होती. शहरातील प्रमुख मार्गावर दुतर्फा ठिकठिकाणी आबालवृद्ध यांसह महिला व पुरुषांनी दर्शनासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली. महिलांनी ओवळण्यासाठी व ओटी भरण्यासाठी एकच गर्दी केली केली. दानशूर व्यक्तींनी आलेल्या भाविकांसाठी जागोजागी जेवण, चहा, फराळ, पाण्याची व्यवस्था केलेली होती. यावर्षी ही वहन मिरवणूक मंगळवारी रात्री सात वाजता सुरु होवून बुधवारी दुपारी ४ वाजता महाआरतीने व प्रसाद वाटपाने संपली. कधी नव्हे ती एवढी तब्बल २१ तास ही मिरवणूक चालली. या वहन मिरवणुकीवर मुस्लिमांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली.