
सामना ऑनलाईन । भोपाळ
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खळताना स्फोट झाल्याने एक सात वर्षीय मुलगा बेशुद्ध झाला व त्याचे हात पाय भाजले. ही घटना मध्य प्रदेशमधील शयोपूर जिल्ह्यात घडली आहे. संदीप असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येथील गुरनावदा गावात राहणाऱ्या मुकेश बैरवा यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा संदीप याने मोबाईलवर गेम खेळण्यास सुरुवात केली. तो गेम खेळत असताना अचानक मोबाईलमध्ये करंट आला व स्फोट झाला. स्फोटात संदीपचे हात पाय भाजले आणि करंट लागल्याने तो बेशद्ध पडला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते अँड्राईड फोनमधली बॅटरी लिथियमने बनलेली असते. यामुळे ती जास्त काळ गरम राहिल्यावर तिचा स्फोट होतो.
दरम्यान, मोबाईलचा स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मोबाईलचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ४ जून रोजी भांडुपमध्ये हॉटेलमध्ये एक युवक जेवत असताना त्याच्या खिशातल्या मोबाईलचा स्फोट झाला होता. यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. हॉटेलमध्ये धूर झाला होता. या घटनेत युवक जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.






























































