21 वर्षांचा नवरदेव अन् नऊ वर्षांची नवरी, मोहोळमध्ये चौघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

21 वर्षांच्या वराबरोबर नऊ वर्षांच्या बालिकेचा विवाह लावल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे घडली आहे. याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई-वडील आणि मुलीच्या आईवर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी व तिची आई बेपत्ता असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

नवरदेव अविनाश दाजी शेळके (वय 21), दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके यांच्यासह पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे 30 नोव्हेंबर रोजी एका नऊ वर्षांच्या मुलीबरोबर कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश शेळके याचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान, हे नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर स्टेटस ठेवले होते. त्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढत अज्ञाताने सोलापूर येथील महिला व बालविकास कार्यालयातील ‘चाइल्डलाइन’च्या क्रमांकावर फोन करीत या बालविवाहाची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलिसांची मदत घेऊन कोन्हेरी येथे जाऊन चौकशी केली. यात अविनाश याने त्याच्या नातेवाईकांच्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी शेळके, तारामती शेळके, नवरदेव अविनाश शेळके व मुलीच्या आईवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.