चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी ‘दिशा’ कायद्यात विशेष तरतूद, 125 गुह्यांमध्ये 40 जणांना अटक

महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुह्यांचा (चाईल्ड पोर्नोग्राफी)ही समावेश करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून आतापर्यंत 125 गुह्यांमध्ये 40 जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात आमदार ऍड. आशीष शेलार आदींनी लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो’ने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असून राज्यात महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

ऑपरेशन ब्लॅक फेस
चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी 18 डिसेंबर पासून राज्यभरात ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली असून देशभरात अशा स्वरूपाच्या कारवाईमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.

40 जण अटकेत
दी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)ने जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील बाललैंगिक अत्याचारांसंदर्भातील 1 हजार 680 ध्वनिचित्रफितींची माहिती महाराष्ट्र सायबर कार्यालयास दिली. त्यानंतर ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ राबविण्यात आले. त्यात 40 आरोपींना अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या