बालकांचे न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी पीसीव्ही लसीचा समावेश करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) या नवीन लसीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण मिळेल. याअंतर्गत दरवर्षी सुमारे 19 लाख बालकांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी इत्यादी लसी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी पीसीव्ही लस दिली जाणार आहे. राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आजपासून या लसीचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून जन्मानंतर सहाव्या आठवडय़ात चौदाव्या आठवडय़ात आणि नवव्या महिन्यात दिली जाणार आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या लसीसंदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सूचना जिह्यांना देण्यात आल्या असून जाणीव जागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स तयार करण्यात आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध आहे. तर शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय तसेच लसीकरण सत्र आयोजित केलेल्या ठिकाणी सर्वांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचे अतिरिक्त संचालक डॉ. डी. एन.पाटील यांनी सांगितले.