चीनमध्ये विमान उड्डाणे थांबवली; ट्रेन्सही बंद

548

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान मांडले असून गुरुवारी सकाळी वुहान येथून बाहेर जाणारी विमान उड्डाणे थांबवण्यात आली असून ट्रेन्सही बंद करण्यात आल्या. वुहानसोबतच हुआनगांग आणि इझोऊ येथे जाण्यास प्रशासनाने लोकांना मनाई केली आहे. या दोन शहरांमधूनही सार्वजनिक वाहतूक बंद असून ट्रेन सोडण्यात आलेल्या नाहीत. वुहानमध्ये या व्हायरसची 600 प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आतापर्यंत 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जागतिक आरोग्य केंद्राचे (डब्लूएचओ) प्रमुख टेड्रॉस एडहेनम गेब्रेयीसुस यांनी याबाबत सांगितले की, ही समस्या जागतिक धोका म्हणून जाहीर करण्यात यावी का यावर आम्ही विचार करत आहोत. लोकांनाही विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. वुहान येथून अखेरचे विमान गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला गेले. या विमानातील सर्व प्रवाशांनी मास्क घातले होते. विमानात आरोग्य अधिकाऱयांनी या प्रवाशांची कसून चौकशी केली. त्यांना कोरोना व्हायरसची लक्षणे सांगितली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी ब्रँडन मर्फी यांनी सांगितले की, वुहान येथून आलेल्या विमानात कुणीही प्रवासी या व्हायरसचा शिकार दिसला नाही.

पहिला रुग्ण 31 डिसेंबरला आढळला

वुहान शहरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 31 डिसेंबरला आढळला होता. या शहरातून बाहेरच्या जगात वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे चीन या व्हायरसवर तेथेच नियंत्रण आणेल अशी शक्यता असल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी सांगितले. कोरोना व्हायरस हा ‘सार्स’ व्हायरसप्रमाणेच असल्याने तो खतरनाक आहे. ‘सार्स’ व्हायरसने 2003 साली चीन आणि हाँगकाँगमध्ये किमान 650 लोकांचा बळी घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या