
सामना ऑनलाईन । पेइचिंग
अनेक देशांतील रेस्टॉरंटमध्ये रोबोंना वेटर, ऑपरेटर आणि ग्राहकांच्या सेवेसाठी नेमण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात आणि रेस्टॉरंटला लोकप्रियताही मिळते. मात्र, या क्षेत्रात चीनने एक पाऊल पुढे टाकले असून त्यांनी चौकीदाराची जबाबदरी रोबोकडे दिली आहे. पेइंचिंगमध्ये मेइबाओ हा ‘रोबो चौकीदार’ रात्री जागता पहारा ठेवणार असून शहरात गस्त घालणार आहे. तसेच शहरात चालणाऱ्या अवैध कामांची माहिती संबधित यंत्रणांपर्यंत पोहचवणार आहे.
‘हा रोबो डिसेंबर 2018 पासून एप्रिल 2019 पर्यंत प्रायोगिक तत्वावर तैनात करण्यात आला आहे. पेइचिंग एयरोस्पेसकडून तयार करण्यात आलेला हा रोबो तयार करण्यासाठी चायना अॅकॅडमी ऑफ लॉन्च वीकल टेक्नॉलॉजीने मदत केली आहे, अशी माहिती पेइचिंग एयरोस्पेस ऑटोमॅटिक कंट्रोल इंस्टिट्यूटचे प्रोजेक्ट डायरेक्टर लिउ गांगजुन यांनी दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील सर्व निवासी परिसरात गस्त घालण्यासाठी रोबो ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हे तंत्रज्ञान बायोलॉजिकल रेकॉग्निशन, बिग डेटा एनालिसिस, नेविगेशन सिस्टम आणि इतर तंत्रज्ञानांसह काम करणार आहे. याव्यतिरिक्त इतर सुविधांचाही त्यात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रोबोला गस्त घालणे आणि विविध घडामोडींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अवैध धंद्याला आळा बसणार आहे. तसेच सुरक्षा वाढणार आहे. मात्र, त्यामुळे चौकीदार आणि गस्त पथकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






















































