
अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर चीनने अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणांची जाहीरपणे खिल्ली उडवली आहे. व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी आता जगातील इतर देशांनाही आपले म्हणणे मान्य करण्यास भाग पाडले आहे. विशेषतः व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर अमेरिकेने कब्जा केल्यानंतर आता त्यांची नजर ग्रीनलँडवर असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान इराणमधील अंतर्गत निदर्शनांवरही अमेरिका बारकाईने लक्ष असून, तिथल्या सरकारवर हल्ला करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि आक्रमक पावित्र्यामुळे संतप्त झालेल्या चीनच्या सरकारी मीडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक एआय-निर्मित व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओचा थेट संबंध डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या जागतिक धोरणांशी जोडला जात आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाची टोपी घातलेले एक पात्र दाखवण्यात आले असून, ते जगाला उद्देशून अत्यंत अहंकारी भाषेत संवाद साधताना दिसत आहे. तुमचे तेल आणि तुमची जमीन ही सर्व माझी शिकार आहे, असे विधान या व्हिडिओतील पात्राकडून वदवून घेण्यात आले आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये चीनने अमेरिकेवर अधिक कडक भाषेत प्रहार केला आहे. मादुरो यांना सत्तेवरून हटवणे हा केवळ एक छोटासा खेळ होता, असे लिहित चीनने अमेरिकेच्या मनमानी कारभारावर बोट ठेवले आहे. या व्हिडिओमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय नियम महत्त्वाचे नाहीत आणि त्यांना कोणतीही कृती करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. माझ्याकडे अफाट सैन्यबळ आहे, त्यामुळे मला जे हवे ते मी करू शकतो आणि जे हवे ते मी मिळवू शकतो, अशा शब्दांत ट्रम्प यांच्या धोरणांची खिल्ली या व्हिडिओत करण्यात आली आहे. चीनच्या या पावलामुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव आता एका नव्या टोकावर पोहोचला असल्याचे चित्र दिसत आहे.


























































