
लडाखच्या सीमेजवळ चीनच्या लष्करी हवाई तळावरील हालचाली वाढल्या आहेत. त्यावर लक्ष ठेवत हिंदुस्थानी हवाई दलानेही सतर्क होत सीमेजवळील लष्करी तळांवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत. हिंदुस्थानी हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी व्यक्त केला. हैदराबाद येथील एअरफोर्स अकॅडेमीच्या पदवीदान संचलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. हवाई दल चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. सीमेजवळील त्यांचे लष्करी हवाई तळ आणि त्यांच्या लढाऊ विमानांच्या वाढलेल्या हालचालींवर हवाई दल लक्ष ठेवत असल्याचे ते म्हणाले. चीनने सीमारेषेजवळ नेहमीपेक्षा जास्त विमाने तैनात केल्याने हवाई दलानेही सीमारेषेजवळ विमानांची संख्या वाढवल्याचे ते म्हणाले.
चीनसोबत युद्धाचा विचार नाही. तसेच सीमारेषेवर युद्धजन्य परिस्थिती नाही. मात्र, हवाई दल कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे हवाई दलाकडून सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. तसेच सीमारेषेवरील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच गलवान खोऱ्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचा अभिमान असल्याचेही भदौरिया म्हणाले. सीमारेषेवर युद्धजन्य परिस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती गंभीर असती, तर आपण हैदराबादमधील या कार्यक्रमाला उपस्थित नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील नागरिकांनी आपल्या सैन्य दलावर विश्वास ठेवावा, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य सक्षम आहे. सीमारेषेवरील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांना कोणताही संदेश देण्याची गरज नाही. त्यांना हिंदुस्थानची क्षमता माहित आहे. मात्र, परिस्थितीवर लक्ष ठेवत सीमारेषेजवळील लष्करी तळावर विमानांची संख्या वाढवण्यासह गस्तही वाढवल्याचे भदौरिया यांनी सांगितले. चीनच्या लष्कराने पेगाँग सरोवर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चीनने घुसखोरी केलेल्या प्रदेशातून माघार घ्यावी, अशी हिंदुस्थानची मागणी आहे.





















































