
हिंदुस्थान-चीन यांच्यामध्ये सीमेवरून तणावाचे वातावरण असतानाच ब्रिक्स गेम्सद्वारे हिंदुस्थानात चीनच्या खेळाडूंना आमंत्रण देण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी घोषणा करताना म्हटले की, 2021 सालामध्ये खेलो इंडिया गेम्सचे आयोजन करण्यात येणार असून याचदरम्यान ब्रिक्स गेम्सही खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही स्पर्धा एकाच ठिकाणी होणार आहेत. ब्रिक्स गेम्समध्ये चीनचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट दूर होत असून पुढल्या वर्षी खेलो इंडिया युथ गेम्स व खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्यात येणार आहे. याच प्रसंगी ब्रिक्समधील सदस्य देशांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
या पाच देशांचा सहभाग असणार
ब्रिक्सची स्थापना 2009 साली करण्यात आली. यामध्ये ब्राझील, रशिया, हिंदुस्थान, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. या पाचही देशांच्या पहिल्या अक्षरावरून ब्रिक्स हे नाव देण्यात आले आहे. या पाचही देशांतील खेळाडू ब्रिक्स गेम्समध्ये सहभागी होतात.



























































