चीनने आळवला कश्मीर राग; अंतर्गत मुद्दा असल्याचे हिंदुस्थानचे प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनने कश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला हिंदुस्थानने कडाडून विरोध केला. कश्मीरमधून कलम 370 हटवणे हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे हिंदुस्थानने ठणकावले आहे. राष्ट्रसंघाच्या नियमानुसार आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार कश्मीर समस्या द्विपक्षीय चर्चेद्वारे शांततेने सोडवायला हवी, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी संयुक्त राष्ट्रांत सांगितले. कश्मीरची सद्यस्थिती बदलेल असे कोणतेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नये, यावर चीनने जोर दिला. चीनच्या या मुद्द्याला कडाडून विरोध करत हिंदुस्थानच्या अंतर्गत मुद्द्यात कोणीही दखल देऊ नये, असे ठणकावत चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) मुद्दा उपस्थित करत हिंदुस्थानने चीनची बोलती बंद केली.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे आम्ही शेजारी असल्याने ही समस्या शांततेने सोडवण्यात यावी अशी अपेक्षा वांग यांनी व्यक्त केली. त्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा सुरू करावी असेही ते म्हणाले. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. सर्व देशांनी हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचा सन्मान करावा आणि देशाच्या अंतर्गत समस्येत हस्तक्षेप करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये चीन अवैध पद्धतीने चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवत आहे. त्यामुळे चीनने असे प्रयत्न थांबवावेत असेही त्यांनी म्हटले आहे.