चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग शुक्रवारपासून हिंदुस्थान दौऱ्यावर

521

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवार, 11 आणि शनिवार, 12 ऑक्टोबर असे दोन दिवस हिंदुस्थान भेटीवर येणार आहेत. चिनी राष्ट्राध्यक्षांच्या या भेटीत ते अनौपचारिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. उभय शेजारी देशांतील द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर उभय नेते सविस्तर चर्चा करतील असे बोलले जात आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग 11 आणि 12 ऑक्टोबरला चेन्नईनजीकच्या मल्लापुराम शहरात पार पडणाऱया शिखर बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ही खास भेट असल्याचे प्रतिपादन चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी केले. या भेटीनंतर जिनपिंग नेपाळ भेटीवर जाणार आहेत.

सीमेवर चीनची सामंजस्याची भूमिका

2017 मध्ये डोकलाम सीमेवर दडपशाही आणि घुसखोरी करणाऱ्या चीनने आता उभय देशांच्या सीमांवर सामंजस्य व शांततेची भूमीका घेतली आहे. जिनपिंग आणि मोदी यांच्यातील चर्चेचा हा परिणाम असल्याचे चिनी प्रवक्ते चुनयिंग यांनी म्हटले आहे. चीनच्या या भूमिकेमुळे गेले 73 दिवस डोकलाम सीमेवर होणाऱया उभय देशांतील लष्करातील चकमकी कमी होऊन तेथील तणावाचे वातावरण निवळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या