शहर उजळवण्यासाठी चीन अंतराळात पाठवणार कृत्रिम ‘चंद्र’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

चीन अंतराळात लवकरच कृत्रिम चंद्र पाठवणार आहे. ज्यामुळे चीनमधलं चेंगदू हे मोठ शहर उजळून निघणार आहे. या कृत्रिम चंद्राचा उजेड खऱ्या चंद्राच्या उजेडाच्या तुलनेत आठ पटीने अधिक असणार आहे. यामुळे चेंगदू शहरातील रस्त्यांवर पथदिवे लावण्याचीही गरज नसेल. असा दावा चेंगदू एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टम रिसर्च इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष वू शूनफेंग यांनी केला आहे.

एशिया टाईम्सने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार चीनमधील सिचुआन प्रांताची राजधानी असलेल्या चेंगदू शहर प्रशासनाने 2020 सालापर्यंत अंतराळात कृत्रिम चंद्र पाठवणार असल्याचे सांगितले आहे. या कृत्रिम चंद्रातून परावर्तित होणारा उजेड पृथ्वीवरील ५० मैल परिसर क्षेत्र उजळवून टाकणार आहे. हा प्रयोग 1999 साली रशियन शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. त्यावेळी सायबेरियातील शहर कृत्रिम चंद्राचा वापर करून उजळवण्याची योजना शास्त्रज्ञांनी आखली होती. पण ती प्रत्यक्षात कधी अंमलात आणलीच गेली नाही. पण आता मात्र चीनने याच तंत्राचा वापर चेंगदू शहर उजळवण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कृत्रिम चंद्राच्या अनेक चाचण्याही करण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत.

दरम्यान, या कृत्रिम चंद्राच्या उजेडाचा दुष्परिणाम शहरे व त्याच्या जवळपास राहणाऱ्या प्राण्यांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.