
नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला नेहमीच विरोध केला. मात्र आज त्यांच्यासोबतच मंचावर एकत्र येऊन सर्वत्र नतमस्तक होताना दिसत आहेत. हे सर्व खुर्चीच्या प्रेमापोटी चालले आहे. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी हे उद्या विरोधकांपुढेही झुकलेले दिसतील, असा टोला लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी लगावला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चिराग पासवान यांनी नितीशकुमार हे खुर्चीच्या प्रेमापोटी भाजपसोबत असल्याचा आरोप केला. मोदी यांचे नेतृत्व कधीच न मानणारे जेडीयू नेते आज न थकता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत प्रचार करताना दिसत आहेत. यामागे त्यांचा एकच स्वार्थ आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकावी, असे चिराग पासवान म्हणाले.
बिहार निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसोबत गळ्यात गळे घालून फिरणारे जेडीयू नेते नितीशकुमार 10 नोव्हेंबरनंतर तेजस्वी यादव यांच्यासमोर झुकताना दिसतील. निवडणूक प्रचारादरमन्यान लोकांनी यांच्यावर कांदे फेकले. त्या लोकांचा प्रश्न काय आहे? हे समजून घेण्याचे सोडून फेका फेका आणखी फेका, असे सांगणे म्हणजे तुमचा अहंकार आहे, असा टोला चिराग पासवान यांनी लगावला.




























































