
कॉलेज रॅगिंग आपल्यापैकी अनेकांनी सहन केलं असेल. अनेकांच्या कटू आठवणी रॅगिंगशी जोडलेल्या असतील. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. या सेलिब्रिटींपैकी एका अभिनेत्रीला तर चक्क बादली घेऊन रॅम्पवॉक करण्याची शिक्षा रॅगिंग करणाऱ्यांनी सुनावली होती.

ही अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंह. 30 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेली चित्रांगदा लहानपणापासूनच धाडसी स्वभाव होता. तरीही तिला दिल्लीतील इरविन कॉलेजमध्ये असताना रॅगिंगचा सामना करावा लागला होता. तिला रोज उलटी सलवार घालून कॉलेजमध्ये येण्यास सांगितलं गेलं होतं. त्यासोबत चपचपून तेल घालून चाळीस वेण्यांमध्ये कॉलेजला येण्यास सांगण्यात आलं होतं. आपली वह्या पुस्तकं तिला बॅगऐवजी बादलीत घालून हॉस्टेलहून कॉलेजमध्ये जाण्यासही सांगण्यात आलं होतं.
जवळपास महिनाभर चित्रांगदाने हे रॅगिंग सहन केलं. एक दिवस तिला पुस्तकांनी भरलेली बादली घेऊन रॅम्पवॉकही करायला सांगण्यात आला होता. गंमत म्हणजे चित्रांगदाने ही अट पूर्ण करताना अतिशय व्यावसायिक मॉडेलिंगप्रमाणे रॅम्पवॉक केला आणि तिला कॉलेजमधून खरोखर रॅम्पवॉकिंगची संधी मिळाली. तेव्हापासून तिचं मॉडेलिंगमधील करिअर सुरू झालं.

























































