Chocolaty चॉकलेटस्!

2514

>> शमिका कुलकर्णी

सायीसारखी जीभेवर विरघळणारी चॉकलेट्स. आज दीपावलीच्या महागडय़ा भेटवस्तूंत मोठय़ा तोऱ्यात मिरवतात. ही चॉकलेट्स केवळ तोंड गोड करण्यापुरती मर्यादित नाहीत, तर याचे आरोग्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी असंख्य फायदे आहेत.

चॉकलेट्स न आवडणारी माणसं विरळाच. अनेक गोष्टींचे प्रतीक हे सहज जीभेवर विरघळणारे लोण्यासारखे चॉकलेट. विविध चवींची, विविध ढंगांची चॉकलेटस् आज उपलब्ध आहेत. प्रेम व्यक्त करायचंय…चॉकलेट पुढे करा… सदिच्छा पोहोचवायच्या आहेत रंगीबेरंगी वेष्टनात गुंडाळलेली चॉकलेटस् आहेतच. आवडत्या व्यक्तिचा राग-रुसवा काढायचाय चॉकलेटखेरीज उत्तम पर्याय कोणता?…छोटय़ा मंडळींचेही चॉकलेटस् म्हणजे हक्काचे सखे सवंगडी; दिवाळी म्हणजे कंदील, फराळ, दिव्यांची आरास, फटाके आणि उत्साहाचे वातावरण. एकमेकांकडे फराळ, गोड पदार्थ वाटण्याची आपल्याकडे पद्धत असते या पदार्थांसोबत अलीकडे चॉकलेटचाही समावेश केला जातो. पण अनेकजण चॉकलेट्स खाणे टाळतात. कारण वजन वाढेल या भीतीने तर काही जण डार्क चॉकलेटचा समावेश आरोग्यासाठी करतात.

म्हणूनच चॉकलेचे महत्त्व, फायदे व तोटे त्याचबरोबर चॉकलेट किती खावे, केव्हा खावे याबाबतही जाणून घेऊया.
चॉकलेट हे कोकोपासून बनवले जाते. या झाडाच्या फळापासून व कोकोच्या बियांपासून 3000 वर्षांपासून विविध पेये व चॉकलेटचे प्रकार बनवले जातात. चॉकलेटचा शोध युरोपियन लोकांनी लावला व अमेरिकेतून स्पेनमध्ये आणले. ही झाडे ब्राझिल, इक्वेडोर घाना या प्रदेशात उगवतात. चॉकलेट हे कोको बीन्सपासून बनवले जाते. चॉकलेटचे विविध प्रकार असतात व त्याच्या उत्पादनातही विविधता असते. त्याच्या कोकोच्या प्रमाणावरून त्याचा दर्जा ठरवला जातो. त्याचबरोबर त्याचे प्रकारही ठरवले जातात.

l डार्क चॉकलेट- यात कोकोचे प्रमाण 45 टक्क्यांपेक्षा अधिक असते व साखरेचे प्रमाण कमी. उच्च दर्जाच्या डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण 55-90 टक्के असते व कमी प्रमाणात साखर.
l सेमी स्वीट चॉकलेट- यात डार्क चॉकलेटबरोबर साखरेचे प्रमाण वाढवले जाते व थोडा गोडवा वाढतो.
l मिल्क चॉकलेट- यात कोको, साखर, व दुधाचे घटक असतात.
l व्हाईट चॉकलेट- यात फक्त कोको बटर, दूधाचे घटक व साखर व त्यासोबत व्हॅनिला समावेश असतो. सर्वसाधारण चॉकलेट जे बाजारात मिळते व डार्क चॉकलेट यात खूप फरक असतो. म्हणूनच यामधला फरक काय आहे व कोणते चॉकलेट किती प्रमाणात आरोग्यदायी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण अधिक असते व साखरेचे प्रमाण कमीत कमी असते. त्याचबरोबर यात दुधाचा समावेश नसतो.

इतर प्रकारची चॉकलेट खाताना किंवा कमी दर्जाची चॉकलेट खाताना त्यांचे दुष्परिणामही लक्षात घेतले पाहिजेत. चॉकलेट बनवताना त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट किंवा कमी कोको असलेल्या चॉकलेट्समध्ये साखरेचे व दुधाच्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे उष्मांक वाढतात. त्याचबरोबर कोको बटरचेही प्रमाण वाढते. म्हणूनच कोणत्याही चॉकलेटचा अतिरेक करणेही योग्य नव्हे.

l प्रमाणाबाहेर चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढ किंवा इतर आजार जसे रक्तदाब वाढणे, स्थुलता वाढण्यास मदत होते. म्हणूनच चॉकलेट कधी तरी खावे व उच्च दर्जाचे खावे.
l अनेकजण चॉकलेट म्हणून बाजारात मिळणारे कंपाऊंड चॉकलेट खातात. यात कोको बटरच्या ऐवजी पाम तेल किंवा इतर वनस्पती तेलांचा समावेश असतो. त्यामुळे डार्क कंपाऊंड किंवा मिलक कंपाऊड हे शरीराला आरोग्यदायी नसते. म्हणूनच चॉकलेट खाताना त्यातील घटक जाणून घ्यावेत. कोको किती टक्के आहे, साखर किती आहे, स्निग्ध पदार्थ कोको बटरच्या रूपात आहेत की पाम किंवा वनस्पती तेलाच्या रूपात आहे हे जाणून घेणे आवश्यक असते.

मग उच्च दर्जाचे डार्क चॉकलेट आरोग्याला गुणकारी असल्यामुळे त्याचा समावेश आठवडय़ातून 3-4 वेळा 1-2 वडय़ा खाऊन करू शकतो. हे शक्यता संध्याकाळच्या आधी खावे किंवा सकाळच्या न्याहरीनंतर खावे. पण जरी आरोग्यदायी असले तरी ते जास्त उष्मांकाचे असल्याने त्याचा समावेश प्रमाणात करणे गरजेचे आहे. डार्क चॉकलेट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने वजन वाढणे, रक्तदाब वाढणे, कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे यांसारखे आजार होऊ शकतात. म्हणून प्रमाणात खाणे योग्य ठरते. आता इतर मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट व कोणतेही सामान्य कंपाऊंड चॉकलेटचा समावेश आहारात मोजकाच करावा. कारण ते आरोग्याला घातक ठरतं.

म्हणूनच बाजारात मिळणारी चॉकलेट्स, कँडीज, चॉकलेटचे लॉलीपॉप किंवा इतर कोणतीही चॉकलेट्स आपल्या आहारात कमीत कमी असली पाहिजेत. सध्या बाजारात आणखी एका चॉकलेटच्या प्रकाराचा समावेश होत आहे. ते म्हणजे गुलाबी रंगाचे रुबी चॉकलेट. हे चॉकलेट रुबी कोको बीन्सपासून केले जाते. याची चव आंबटगोड असते. हे चॉकलेट नुकतेच बाजारात दाखल झाल्याने अजून बऱयाच जणांना नवीन आहे. चॉकलेटचा समावेश आहारात कसा कराल याविषयी जाणून घेऊया-

l चांगल्या दर्जाचे डार्क चॉकलेट आठवडय़ात 1-4 वेळा खावे. हे प्रकृतीसाठी आरोग्यदायी असते.
l चॉकलेटमध्ये बदाम, काजू, अक्रोड व इतर सुक्या मेव्याचा समावेश करावा व ही चॉकलेट पौष्टिक मिठाई म्हणून खावी.
l दुधात चॉकलेटचा समावेश केला तर लहान मुलांना दूध प्यायला आवडते, पण दुधात कोको पावडर घालावी.
l मुलांना फळे खायला देताना एक गंमत म्हणून ही फळे किंवा त्यांचे तुकडे वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवून फ्रीजमध्ये ठेवावी. मग गार फळे चॉकलेटसोबत उत्तम लागतात.
l बाहेरून चॉकलेट विकत घेण्याऐवजी चॉकलेट घरच्या घरी करून एका उत्तम प्रकारच्या चॉकलेटचा अस्वाद घ्यावा.

चॉकलेटचा समावेश प्रमाणात एक आवड म्हणून आहारात केला तर वजनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. लहान मुलांना सुरुवातीपासून चांगल्या दर्जाच्या चॉकलेटची चव आत्मसात करायला शिकवले पाहिजे. चॉकलेट्स चांगल्या दर्जाची खावीत मोजक्या प्रमाणात खावी, आणि थोडक्यात आनंद मानावा. तरच त्याचा फायदा होतो.

डार्क चॉकलेटचे फायदे-
डार्क चॉकलेटमध्ये अधिक प्रमाणात कोको असते. कोकोमध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात.
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीओक्सीडेट्सचा समावेश असतो. हे अँटीऑक्सिडंटस शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षा देतात.
कोकोमध्ये अनेक जीवनसत्त्वे व खनिजे यांचा समावेश असतो. क, ब अशी जीवनसत्त्वे असतात, तर मॅग्नेशियम, सेलेनियमसारखी खनिजे असतात.
थोडय़ा प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतात.
उच्च दर्जाचे चॉकलेट खाल्ल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते, उत्साह वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर निराशावाद दूर करण्यास मदत होते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या