कट्टर राणे समर्थक छोटू ठाकूर यांचा शिवसेनेत प्रवेश, शेकडो ग्रामस्थांनी बांधले ‘शिवबंधन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मसुरे-डांगमोडे गावातील कट्टर राणे समर्थक माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी शेकडो ग्रामस्थांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती ‘शिवबंधन’ बांधत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा खांद्यावर घेतला. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. पक्ष प्रवेशाचा निर्णय ग्रामस्थांना सोबत घेऊन घेतला आहे. मी ग्रामस्थांच्या सोबत आहे. शिवसेना जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी घेऊन माझ्या मर्डे-मसुरे-डांगमोडे गावांसह संपूर्ण परिसरात संघटना अधिक मजबूत करणे व विकासकामातून जनतेची सेवा करणे, हेच आपले कर्तव्य असेल, असे प्रवेशकर्त्या छोटू ठाकूर यांनी सांगितले.

जनसंवाद अभियानच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक मसुरे दौऱ्यावर असताना डांगमोडे गावात हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गोपी पालव, नगरसेवक सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, संदीप हडकर, शाखाप्रमुख सचिन पाटकर, प्रकाश ठाकूर, सुजाता पेडणेकर, माया मुणगेकर, विभागप्रमुख पराग खोत, राजा कोरगावकर, सुहास पेडणेकर, बाबू पारकर, विजय पालव, जानव्ही सावंत, श्वेता सावंत, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, पूजा तोंडवळकर, हेमंत परब, मामा पेडणेकर, मोहन मुणगेकर, आबा परब, पंकज वर्दम, महेंद्र म्हाडगूत, यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. ‘छोटू ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. खाजनवाडी येथील स्वाभिमान कार्यकर्ते पिंट्या गावकर यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.