
कळंबोलीतील उद्यानाचे पाणी सिडकोने बंद केले आहे. त्यामुळे उद्यानातील फुलझाडे, वेलींनी माना टाकल्या आहेत. उद्यान सुकून गेले आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. उद्यानात कचऱ्याचे ढीग साचले असून फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर-6मध्ये मोठे उद्यान आहे. सिडकोने नळजोडणी तोडल्याने पाच ते सहा दिवसांपासून झाडांना पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्यानातील झाडे सुकू लागली आहेत. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. सुरक्षारक्षकही नाही. त्यामुळे उद्यानात काही जण सायकल चालवतात तर काही जण फुटबॉल खेळतात. उद्यानातील खेळणी ही तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छतेअभावी कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक व माळी नाही. दिवेही बंद असल्याने रात्रीच्या वेळी गर्दुल्ले उद्यानात ठाण मांडून असतात. त्यामुळे उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्यायला पाणी नाही तर झाडांना कुठून देणार?
उद्यानातील पाणी बंद केल्याने नागरिकांनी सिडकोचे अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला. या वेळी गाडे त्यांनी सांगितले की, सिडकोच्या वरिष्ठ पातळीवरूनच उद्यानातील पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. नागरिकांना प्यायला पाणी नाही, तेथे झाडांना पाणी कुठून देणार, असा बेजबाबदार प्रतिसवालही त्यांनी केला.






























































