वादग्रस्त नागरिकता दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून हिंदुस्थानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, पारशी, बौद्ध व ख्रिश्चन या अल्पसंख्याक धर्माच्या आश्रितांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याची तरतूद करणारे वादग्रस्त नागरिकता दुरुस्ती विधेयक आज लोकसभेने आवाजी मतदानाने मंजूर केले. शिवसेनेसह अनेक मित्रपक्षांनी, विरोधी पक्षांनीही या विधेयकाविरोधात आवाज उठवला होता, मात्र आवाजी मतदानाद्वारे या विधेयकाला लोकसभेने मंजुरी दिली.

पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून हिंदुस्थानात शरणार्थी म्हणून आलेल्या नागरिकांना सहा वर्षे वास्तव्यास पूर्ण झाली असतील तर त्यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व बहाल करण्याचा वादग्रस्त निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णाचे देशभर तीव्र पडसाद उमटले असून आसाममध्येच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने सरकारच्या निर्णयाविरोधात आसाममधील भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

जाणीवपूर्वक भ्रम निर्माण केला जातोय – राजनाथ

नागरिकता दुरुस्ती विधेयक हे केवळ आसामपुरते मर्यादित नसून देशाच्या दूरवर दिल्ली, गुजरातमध्ये राहणाऱया आश्रितांनाही त्याचा लाभ होईल. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या हक्कांची पायमल्ली होते. अफगाणिस्तान व पाकिस्तानातही अशा प्रकारच्या घटना उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक नागरिकांना हिंदुस्थानशिवाय सुरक्षित पर्याय नाही.

विधेयक भुमिपुत्रांच्या विरोधातील – शिवसेनेची टीका

नागरिकता दुरुस्ती विधेयक हे आसाममधील स्थानिक भूमिपुत्रांच्या विरोधात आहे. या विधेयकासंदर्भात आसाम गण परिषदेच्या नेत्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना कायमच भूमिपुत्रांच्या पाठीशी असून  हे विधेयक म्हणजे ‘असूनी खास मालक घरचा चोर म्हणती त्याला’ अशा पद्धतीचे आहे, अशी टीका शिवसेनेने या विधेयकावर केली. घुसखोरांचा प्रश्न गंभीर असून मुंबई व महाराष्ट्राने त्याचे गंभीर परिणाम भोगलेले आहेत. बांगलादेशी नागरिकांची नावे आज मतदार यादीत दिसत आहेत. आजच्या विधेयकामुळे हिंदुस्थानचे नागरिक होणारी मंडळी उद्या मतदार यादीतही दिसतील. त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळेल. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांचा संकोच करून त्यांची गळचेपी करण्यापेक्षा मूळ समस्यांचे निराकरण करा, अशी भूमिका शिवेसना खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयकावरील चर्चेत बोलताना मांडली.