
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मोदी सरकारने समान नागरी कायद्याचा विषय अजेंडय़ावर घेतला आहे. आता समान नागरी कायद्याची वेळ आलीय. भाजप जे बोलते ते करतेच, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रविवारी डेहराडूनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अयोध्या श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या निकालावर प्रतिक्रिया जाणून घेताना पत्रकारांनी राजनाथ सिंह यांना समान नागरी कायद्याबाबत प्रश्न केला. त्यावर सिंह यांनी आता या कायद्याचीही वेळ आलीय. भाजप बोलणे आणि कृती करणे यात अंतर ठेवत नाही, असे सांगून सिंह यांनी मोदी सरकारच्या अजेंडय़ावरील पुढील विषय समान नागरी कायदा असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
दिल्ली हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी
समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणाऱया विविध याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल आहेत. या प्रकरणी मुख्य न्यायमूर्ती डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (15 नोव्हेंबरला) सुनावणी होणार आहे.






























































