
देशाच्या पंतप्रधानांचेच ट्विटर हॅण्डल हॅक होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा रोकडा सवाल करत काँग्रेसने आज सरकारला लोकसभेत घेरले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सीबीएसई परीक्षांच्या मुद्यावरून सरकारच्या धोरणांवर टीका केली. दुसरीकडे राज्यसभेत निलंबित खासदारांचे निलंबन मागे घेतले जावे, अशी मागणी विरोधकांनी कायम ठेवली. त्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूबही करावे लागले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज संसदेवर 20 वर्षांपूर्वी झालेल्या निंदनीय हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली; मात्र ती गोंधळातच. लोकसभेचे कामकाज राज्यसभेच्या तुलनेत बऱयापैकी सुरळीत पार पडले. राज्यसभेत मात्र, बारा निलंबित खासदारांचे निलंबन परत घेण्यावरून विरोधकांनी आजही आक्रमक रूप धारण केल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूबही करावे लागले.
लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हॅण्डल हॅक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. एकीकडे डिजिटल इंडियाचे ढोल वाजवले जात आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधानांचेच ट्विटर हॅण्डल हॅक होत आहे. देशाच्या सत्ताप्रमुखाच्या बाबतीत जर असे प्रकार घडत असतील सर्वसामान्यांचे काय, या सोशल साईटवरची माहिती कितपत सुरक्षित आहे, असा सवाल करत अधीररंजन यांनी सरकारला धारेवर धरले.

























































