स्वच्छ मुंबईसाठी पाच ठिकाणी प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रणा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वच्छ मुंबईसाठी पालिका पाच ठिकाणी प्रदूषण मोजणाऱया यंत्रणा बसवणार असून प्रदूषण कमी करण्यासाठी आराखडा बनवून कार्यवाही करणार आहे. या प्रदूषण मापकांवरील हवेच्या शुद्धतेची पातळी मोजून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे मुंबई प्रदूषणमुक्त स्वच्छ सुंदर होण्यास हातभार लागणार आहे.

मुंबई स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या बंदी यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सिस्टीम ऑफ एअर क्लालिटी अॅण्ड वेदर फॉरकास्टिंग अॅण्ड रीसर्च (सफर)उपक्रमाअंतर्गत आठ ठिकाणी स्वयंचलित प्रदूषण मापके बसविण्यात आली आहेत. या प्रदूषण मापकांमार्फत या ठिकाणच्या प्रदूषणाची नोंदणी मोबाईल ऑप्लिकेशनवरही उपलब्ध होते. मुंबईत 55 ठिकाणी अशी प्रदूषण मापके बसविण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील पाच ठिकाणे निश्चित करून कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी दिली.

अशी होणार कार्यवाही

प्रदूषण मापके बसवल्यावर त्यांच्या दैनंदिन नोंदीनुसार कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात वाढ होते याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. एखाद्या ठिकाणी कचरा जाळल्यामुळे प्रदूषण होत असेल तर कचरा नेमका त्या परिसरात कुठे जाळला जातो याचा शोध घेऊन त्यावर उपाय करता येतील. जर एखाद्या भागात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण जास्त प्रमाणात असेल तर तसे उपाय करणे शक्य होणार आहे.

या ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा

  • पंतनगर महानगर पालिका शाळा, घाटकोपर पूर्व
  • शिवाजी नगर बेस्ट बस डेपा, देवनार
  • माहुलगाव महानगर पालिका, चेंबूर
  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, भायखळा पूर्व
  • चारकोप प्रसूतिगृह, कांदिवली पश्चिम