स्कूल बस मेट्रोच्या बॅरिकेडला धडकल्याने क्लीनरचा मृत्यू, 2 विद्यार्थी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

भरधाव वेगाने निघालेली स्कूल बस आज मेट्रोच्या बॅरिकेडस्ला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले तर बसच्या क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेसहा वाजता गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडला.

गोरेगावातील एका प्रतिथयश खासगी शाळेची ही बस घेऊन चालक-क्लीनर महामार्गावरून सुसाट निघाले होते. बसमध्ये अर्थातच विद्यार्थी होते. शाळेची वेळ गाठण्यासाठी बस वेगाने निघाली होती, मात्र बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गावर मेट्रोचे काम सुरू असून ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. बस एका बॅरिकेडस्ला जोरदार धडकली. त्यावेळी बसचा क्लीनर उमेश गुरव हा दरवाजातच उभा होता. त्याचा हात बॅरिकेडस्मध्ये अडकला आणि तो रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारासाठी त्याला नजीकच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वनराई पोलिसांनी बसचालक रामजीत गौड याला अटक केली आहे.

या बसमध्ये इयत्ता सातवी ते नववीचे 34 विद्यार्थी होते. बसचा अपघात होताच विद्यार्थ्यांनी एकच आक्रोश केला. बसची एक बाजू बॅरिकेडस्ला घासत गेली. त्यामुळे दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात खाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या अपघातामुळे स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.