
अतिवृष्टी, पाणी का तुंबते, उष्णतावाढ अशा कारणांचा शोध घेऊन शुद्ध हवा, पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजना करून मुंबईच्या सुरक्षेसाठी पालिकेने ‘क्लायमेट चेंज अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या आराखडय़ानुसार 20 नोव्हेंबरपर्यंत नागरिक, तज्ञ आपल्या हरकती-सूचना पाठवू शकणार आहेत. यानंतर या आराखडय़ानुसार मुंबईला असणारे नैसर्गिक धोके कमी करून पर्यावरण संतुलन, जैवविविधतेच्या रक्षणासाठी उपाययोजनांबाबत काम केले जाणार आहे.
मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश आणि जगात गेल्या काही वर्षांपासून क्लायमेट चेंजचे परिणाम दिसू लागले आहेत. वातावरणात वाढलेले तापमान काही तासांत अनेक महिन्यांचा पाऊस पडत असल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. अशा अनेक नैसर्गिक आपत्तींसह मुंबई स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी या कृती आराखडय़ानुसार काम केले जाणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. या कृती आराखडय़ाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजन बनसोडे, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजीव कुमार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱहाड, सचिव अशोक शिनगारे, उपायुक्त संगीता हसनाळे, सुनील गोडसे, घन कचरा व्यवस्थापन प्रमुख अभियंता अशोक यमगर आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा तयार होत आहे.
सहा टप्प्यांत होणार काम
अॅक्शन प्लॅननुसार सहा टप्प्यांत काम केले जाणार आहे. यामध्ये घन कचऱयाचे व्यवस्थापन, महानगरातील हिरवळ व जैवविविधता, पूर आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमतेची उभारणी, स्वच्छ हवा आणि श्वाश्वत वाहतूक यंत्रणा अशा सहा टप्प्यांत कृती आराखडय़ानुसार काम केले जाणार आहे.
…तर ए, बी, सी, डी भाग पाण्याखाली
मुंबईत पावसाचा अनियमितपणा वाढला आहे. एका दिवसात 100 ते 200 मिमीपर्यंत पाऊस पडतो, तर चक्रीवादळे वाढली, थंडी गायब, उष्णता वाढली आहे. वातावरणातील बदलांबाबत उपाययोजना आतापासूनच कराव्या लागतील अन्यथा 2050 पर्यंत पालिकेचे ए, बी, सी आणि डी हे वॉर्ड आणि कफ परेड, नरीमन पॉइंटचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल अशी भीती पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केली.
मुंबई मॉडेलचे काैतुक!
- कोरोना रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काैतुक केले. कोरोना रोखण्याच्या कामगिरीचे जगात काैतुक झाले. जगातील शहरांनी मुंबई मॉडेल अमलात आणले. त्यामुळे महापौरांसह पालिका प्रशासन काैतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
- जागतिक पातळीवरील वातावरणातील बदलाचे परिणाम आता मुंबईतही दिसू लागल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या समृद्ध नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्याची आम्ही ग्वाही देतो, असेही त्या म्हणाल्या.
…तर पुढील दहा वर्षांत मुंबई राहण्यासाठी योग्य राहणार नाही!
क्लायमेट चेंजमुळे मुंबईत गेल्या वर्षापासून अनेक वेळा आपत्कालीन स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता तरी ठोस निर्णय घेऊन उपाययोजना, कृती करण्याची गरज आहे अन्यथा पुढील दशकभरात मुंबई राहण्यासाठी अयोग्य ठरेल अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईच्या विकास आराखडय़ाची अंमलबजावणी करतानाच वातावरणाच्या बदलाचे आव्हान पेलण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करून वातावरणाच्या बदलाचे धोके कमी करण्याचा उद्देश या कृती आराखडय़ामागे असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या कृती आराखडय़ाच्या कामानुसार तयार झालेले ‘मुंबई मॉडेल’ देशात आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






















































