हवामान बदलात शेती टिकवण्यासाठी पिकांमध्ये विविधता आणायला हवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिकदृष्टय़ा श्रीमंत देशांनी केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदलाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे विकसनशील देशांनाही श्रीमंत व्हायचे असताना आता जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्याची मागणी जोर धरत असून याचा फटका हिंदुस्थानसारख्या देशाला बसत आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या या आव्हानात शेती टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवे आणि पिकांमध्ये विविधता आणायला हवी, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आज महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने मुंबईत कृषी फलोत्पादन प्रक्रिया, सिंचन व हवामान बदल परिषदेचे आयोजन अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले होते. या परिषदेत बोलताना अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. उसासारख्या अधिकाधिक पाण्याचा वापर होणाऱ्या पिकांकडे न जाता पर्यायी पिकांचा विचार करायला हवा. यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवे, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. या अनुषंगाने प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी व पावसात व विषम हवामानात तग धरणारी पिके उत्पादनावर भर देणे यावर गांभीर्याने चर्चा करून शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने पावले उचलण्यात येत आहेत त्यासाठी हवामान बदल कृषी, फलोत्पादन, प्रक्रिया सिंचन व दुग्धविकास परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. या वेळी शेतीत नवनवीन प्रयोग करून यशस्वी ठरलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार डॉ. काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक अजयकुमार सिंह, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवसाय अधिकारी समीर पाटील, कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी संचालक डॉ. यू.व्ही. महाडकर आदी उपस्थित होते.