जालन्याच्या अंबड तालुक्यात ढगफुटी, सुखापुरी महसूल मंडळात शेतीचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात विजेच्या कडकडाटासह 3 तास पडलेल्या 113 मिमी पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीनच्या पिकांत पाणी जमा झाल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशी सह, मका, तूर, उडीद पिकाचेही शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांचे दिवाळ निघाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

अंबड तालुक्यातील सुखापूरी महसूल मंडळात 10 ऑक्टोंबर रोजी 77 मिमी पाऊस व दुसऱ्या दिवशी 11 ऑक्टोंबर रोजी 113 मिमी रेकॉर्डब्रेक ढगफुटीचा पाऊस झाल्याने खरीपाचे पिक पाण्यात आहेत. सोमवारी रात्री उशिराने पडलेल्या परतीच्या पावसाने सुखापुरी महसूल मंडळात जोमात आलेली सर्व पिके हातची गेली आहेत. परिसरातील सर्व नदी तसेच खार नाल्याला पाणी आल्याने यावर्षी खळखळून वाहिले आहे. यावर्षी वेधशाळेने पुन्हा एकदा वेधशाळेने दिलेला पावसाचा अंदाज चुकल्याने कमी पावसात खरीपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या होत्या. मात्र जुलै, ऑगष्ट तसेच सप्टेंबर महिन्यात पडलेल्या थोड्याफार पावसाने पिके जोमात आली होती.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कपाशीला सुमारे 8 हजार 100 रुपयांचा भाव मिळला होता. त्यामुलें सुखापूरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार असे वाटले होते. मात्र परतीच्या पावसामुळे दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी स्वतःकडील सर्व पदरमोड तसेच सोनेनाने गहाण ठेऊन मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुखापूरी महसूल मंडळातील खरीप पिकांचे ताबडतोब पंचनामे करून सरकारने सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.