
पश्चिम बंगालच्या उपसागरात जन्मलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाने मराठवाडय़ाच्या काळजाचा थरकाप उडवला. या वादळामुळे मराठवाडय़ात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसाने रातोरात लहानमोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. कित्येक तलाव फुटले, शेती वाहून गेली. सोयाबीन, कापूस, उसासह इतर पिके बरबाद झाल्याने शेतकऱयांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. बीड, लातूर, धाराशीवमध्ये मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. दरम्यान, वादळी वाऱयासह झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडय़ात 10 जणांचा बळी घेतला.
सोमवारी दिवसभर मराठवाडय़ात पावसाळी वातावरण होते. काही ठिकाणी पावसाची भूरभूर चालू होती. सायंकाळी संपूर्ण मराठवाडय़ावर काळेकभिन्न ढग दाटून आले. बघता बघता पावसाने तांडव करायला सुरूवात केली. पावसाचा हा रौद्रभीषण अवतार पाहून बीडकरांच्या काळजाचा थरकाप उडाला. जिल्हय़ातील लहान मोठय़ा नद्यांनी पात्र बदलले. शेतशिवार जलमय झाले. या पावसाने मराठवाडय़ात 10 जणांचा बळी घेतला.
- एका रात्रीतून मांजरा धरण शिगोशिग भरले. पाणलोट क्षेत्रातून महाकाय लोंढे येत असल्याने रात्रीच धरणाचे सहा दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले. दरवाजे उघडत असतानाच वीज पुरवठा खंडित झाला.
- कज तालुक्यावर आभाळच फाटले. संततधार पावसाने तालुक्यातील अनेक बंधारे फुटले. शेती वाहून गेली. भाटुंबा, कुंभेफळ, पिसाटी, मांजरसुंबा, अंबाजोगाईकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. आपेगाव येथे पुरात अडकलेल्या लोकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे.
- लातूर जिल्हय़ात रात्रभरात 66 मिमी पावसाची नोंद झाली. धुवाधार पावसाने जिल्हय़ातील सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. मुसळधार पावसाने सोयाबीन, कापसासह इतर पिकांचे मातेरे झाले आहे.
- नांदेडात गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. मनपाच्या पथकाने आतापर्यंत 200 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. नावघाट, दासगणू घाट पाण्याखाली गेला आहे. नांदेड शहराला महापुराचा वेढा पडण्याची भीती आहे.
- जालना जिह्यात सोमवारी मध्यरात्री आभाळच कोसळले. मोसंबी, द्राक्ष, सोयाबीन आदी पिकांसह फळ-भाज्यांचे नुकसान झाले.
पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळं एसटी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना यवतमाळ जिह्यात घडली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. पुलावरून पाणी वाहत असतानाही एसटी चालकाने नको ते धाडस करत बस पुलावरून नेली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. अपघातात चालक व वाहक या दोघांसह दोन प्रवाशांनीही प्राण गमावले.
संभाजीनगरला जबर तडाखा
वादळाचा जबर तडाखा संभाजीनगरला बसला. सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी पहाटे भयंकर रूप धारण केले. सकाळी 10 वाजता पावसाने तिसरा नेत्रच उघडला. अवघ्या दीड तासात शहरात 40 मिमी पाऊस झाला. सगळय़ा वस्त्या, कॉलन्या, अपार्टमेंट, सोसायटय़ा पावसाने जलमय झाल्या. रस्ते बुडाले. ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. जायकवाडी धरण दोन दिवसांत भरण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्हय़ात कहर
धाराशिव जिह्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. धाराशिव तालुक्यातील दाऊतपूर येथे पुरात सहा नागरीक अडकले होते. तसेच सौंदणा अंबा येथे पुरात अडकलेल्या दहा नागरिक अडकले होते. त्यांना या हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात आले. तब्बल 28 वर्षांनंतर तेरणा नदीला महापूर आला आहे. परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणही भरले आहे. खासापुरी, चांदणी, साकत प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
परभणी जिल्हा जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्हय़ात गेल्या सहा दिवसांपासून पावसाने संततधार लावली आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसाने संपूर्ण जिल्हय़ाचा तलावच बनला. पालम तालुक्याला लेंडी नदीच्या पुराचा विळखा पडला असून अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. पुयणी, तेलजापूर, वनभुजवाडी, आडगावसह 12 गावे तीन दिवसांपासून महापुराच्या वेढय़ात फसली आहेत. ढालेगाव, मुदगल आणि तारूगव्हाण येथील गोदावरी नदीवरील बंधाऱयातून दीड लाख क्युसेसचा विसर्ग करण्यात येत आहे. खडकपूर्णा धरणाचेही 19 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
केंद्राने सात हजार कोटी मदत द्यावी
अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नुकसान पाहता राज्याला किमान 7 हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी मागणी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठवाडय़ात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसात कालपर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत दिली जाईल. याशिवाय चार हजार जनावरे दगावली असून 20 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
48 तास धोक्याचे; ‘शाहीन’ घोंघावतेय!
उत्तर हिंदुस्थानला जोरदार तडाखा देऊन कमजोर पडलेले ‘गुलाब’ चक्रीवादळ ‘शाहीन’ चक्रीवादळाच्या रूपात पुन्हा धडकणार आहे. ‘गुलाब’ वादळ उत्तर तेलंगणाकडे सरकले असून त्यापासूनच अरबी समुद्रावर ‘शाहीन’ वादळ तयार होत आहे. सध्या छत्तीसगढ आणि ओडिसाच्या दक्षिणेला असलेले कमी दाबाचे क्षेत्र 30 सप्टेंबरला अरबी समुद्रात प्रवेश करणार आहे. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा परिसरात पुढील 48 तासांत अतिवृष्टी होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईकरही ‘ओलीस’
‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने मुंबईलाही ओलीस धरले आहे. शहर व उपनगरांत सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी संपूर्ण दिवसभर मुसळधार हजेरी सुरू होती. या पावसाने रस्ते वाहतुकीला जागोजागी ब्रेक लावल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱया नोकरदारांचा खोळंबा झाला.
रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सकाळी उपनगरांत काही भागांत पाणी साचले होते. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांबरोबर इतर प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक मंदावली होती. लोकल मात्र नियमित वेळापत्रकानुसार धावत होत्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शहरात शुक्रवारपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. मुंबईत सलग तिसऱया वर्षी पावसाने 3 हजार मि.मी.ची सरासरी ओलांडली आहे.

































































