कॅप्टनचा डाव; सिद्धूंपुढे माफीचा पेच!पंजाब काँग्रेसमध्ये वादाला नवे वळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब काँग्रेसमधील वाद मिटण्याची शक्यता असतानाच पुन्हा नवे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री पॅप्टन अमरिंदर सिंग यांनी डाव टाकला असून नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे, पण त्यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी अट घातली आहे. त्यामुळे सिद्धू यांच्यापुढे ‘माफीचा पेच’ उभा राहिला आहे.

विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना मुख्यमंत्री पॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचे गट आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र आहे. हा वाद मिटविण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून चर्चा आणि भेटीगाठी सुरू आहेत. काल शुक्रवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. त्यानंतर सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असे वृत्त आहे. त्यावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग नाराज असल्याचे समोर आले. अमरिंदर सिंगांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले. पक्षश्रेष्ठाRनी पंजाब सरकार आणि तेथील राजकारणात हस्तक्षेप करू नये. पंजाबमधील परिस्थिती त्यासाठी अनुकूल नाही. पक्षाला आणि सरकारलाही मोठी किंमत चुकवावी लागेल, असे या पत्रात अमरिंदर सिंग यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

 दिल्लीहून परतलेले सिद्धू यांनी मंत्री आणि आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. तर दुसरीकडे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी अमरिंदर सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. पक्षश्रेष्ठाr जो निर्णय घेतली ते आम्हाला मान्य आहे, असे मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारमध्ये नेतृत्वबदल होणार नाही, पण नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. त्यास अमरिंद सिंग यांनी सहमती दर्शविली. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या जोडीला दोन कार्यकारी अध्यक्ष असतील. अमरिंदर सिंग त्यांची निवड करतील.

सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांची भेट होईल अशी चर्चा होती. परंतु अमरिंदर सिंग यांनी अट टाकली आहे. मंत्रिमंडळाबाहेर पडताना सिद्धू यांनी अमरिंदर सिंग सरकारवर जाहीर आरोप केले होते. सिद्धू यांनी जाहीरपणे माफी मागावी तरच आपण भेटू, अशी अट अमरिंदर सिंग यांनी टाकली असल्याचे वृत्त आहे.