
सामना ऑनलाईन । सांगली
काँग्रेसी विचारांपासून मुक्त हिंदुस्थानचा निर्धार आम्ही करत होतो. पण सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचा पहिला मान मिळवला. त्यामुळे या मतदारसंघात त्यांना उमेदवारही सापडला नाही, अशी अवस्था झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सांगली ही वसंतदादांची भूमी असून येथून काँग्रेसच्या उमेदवाराने स्वतःच्या चिन्हावर लढण्याची आवश्यकता असताना आज वसंतदादांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसन्या तिकिटावर लढत आहेत. उमेदवारी देताना एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाची जिरवली. स्वाभिमानी म्हणणाऱ्यांचा स्वाभिमान आता शिल्लक तरी आहे का, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली.
शरद पवारांच्या विरोधात शेट्टी यांनी अनेक तक्रारी माझ्याकडे केल्या होत्या. साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता तेच अशाच भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले असून शेट्टी त्यांच्या पक्षाचे नाव स्वाभिमान असले तरी खरा स्वाभिमान त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. आहेत त्यांच्याकडे असलेला स्वाभिमान म्हणजे सदाभाऊ खोत आमच्याकडे असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.
पवारांनी पातळी सोडली…
पवारांनी आता टीका करताना संपूर्ण पातळी सोडली आहे. चड्डय़ा घालून मांडी दाखवू नका अशी भाषा ते वापरत आहेत. मी त्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही. पण त्यांच्याच पाठिंब्यावर आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो होतो याचे भान त्यांनी ठेवायला हवे, असे फडणवीस म्हणाले.






























































