
सामना प्रतिनिधी । सोलापूर / पंढरपूर
‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे अणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा’, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्ह्यात दहा एसटी बसेसची तोडफोड केली, तर दोन बस पेटविण्यात आल्या. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला असून, ‘मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या महापुजेचा हट्ट सोडून द्यावा’, आधी आरक्षण जाहीर करावे आणि मगच पंढरपुरात यावे, अन्यथा गनिमीकाव्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी सोहळ्यासाठी रविवारी पंढरपुरात येत आहेत. त्या धर्तीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन तीक्र केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व पोलीस प्रशासनाने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर चर्चेसाठी पाचारण केले होते. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद न देता कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे पालकमंत्र्यांना रिकाम्या हाताने सोलापूरला परतावे लागले.
सोलापुरात मराठा मोर्चाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण; दोन एसटी बस जाळल्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवरून मराठा समाज मंडळ व मराठा क्रांती मोर्चाने सोलापुरात केलेल्या आंदोलनात सुमारे तेरा एस. टी. बसेस फोडण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम, तर संभाजी महाराज चौकात मुंडन आंदोलन करत सरकारचा तीक्र निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारून व अंडी फेकून प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, वातावरण तणावपूर्ण झाले आहे.



























































