नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे, संजय राऊत यांची टीका

नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं करायला लावली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देशात जो दहशतवाद सुरू आहे, त्याचा पालनकर्ता हा पाकिस्तान आहे. पण जेव्हापासून मोदी पंतप्रधान झाले आहेत, एस जयशंकर आणि अमित शहा पदावर आले आहेत तेव्हापासून आपण सिद्ध नाही करू शकत. आणि युनाटेड नेशन्सने सिक्युरिटी काऊन्सिलचे महत्त्वाचे पद हे पाकिस्तानकडे गेले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांना मेजवानीसाठी बोलावलं जातं. खुप सारे देश हे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. आणि आतापर्यंत हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री असो वा संरक्षण विभाग असो यांच्याकडून काहीच स्पष्टीकरण आलेले नाही. पंतप्रधान मोदी यांची 56 इंचाची छाती आहे, त्यांनी जाब विचारायला हवा. त्यांनी ट्रम्प विचारायला हवं. ही बाबा अतिशय गंभीर आहे, आणि आजही पंतप्रधान मोदी परदेशात फिरत आहेत. युनाटेड नेशन्समध्ये आपल्याला पाठिंबा देणारा कुणी नाहिये. नेतन्याहूंना विचारा की तुम्ही आम्हाला पाठिंबा देणार का? ज्या पद्धतीने पाकिस्तानात ताकद देण्याचे काम ट्रम्प करत आहेत, हे हिंदुस्थानासाठी धोकादायक आहे असे संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी दौऱ्यावरच असतात. त्यांच्याकडे टूर्स आणि ट्रॅव्हेलर्सचेही खातं द्यायला हवं होतं. मन की बात कार्यक्रमात सांगितले पाहिजे की आपल्या देशातील लोकांनी कुठल्या देशात फिरायला पाहिजे काय खाल्लं पाहिजे कुठ्ल्या हॉटेलमध्ये रहावं, कुठे डिस्काऊंट मिळतं. महाराष्ट्रात तीन महिन्यांत एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे पंतप्रधान मोदींना माहित आहे का? आतापर्यंत पहलगामचे चार दहशतवादी आपण शोधू नाही शकलो. हे मोदींना माहित आहे का? अहमदाबादमध्ये विमान का कोसळलं हे आपण शोधू नाही शकलो. आणि मोदीजी जगात फिरत आहेत. ही देशाची अवस्था आहे सध्याची.

विजयी मेळाव्याची दोन्ही बाजूने तयारी सुरू आहे. याचे आमंत्रण कुणाला घरी जाऊन देणार नाही. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी सगळ्यांना या जल्लोषात सामी होण्याचे आवाहन केले आहे. सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला हा मराठी माणसाचा आणि एकजुटीचा विजय आहे. मराठी माणसं एकत्र येणार त्या भितीने हा घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे समस्त मराठी बांधवांनी हा जल्लोष साजरा करावा अशी दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका आहे. त्यानुसारच कालचे निमंत्रण समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे. राजकीय पक्ष, जात, धर्म यांचा विचार न करता त्या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे अशी आमची भूमिका आहे असेही संजय राऊत म्हणाले.

हा राजकीय मेळावा नाही, काल रात्री माझी राज ठाकरे यांच्यांशी चर्चा झाली. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलणं झालं. मान अपमान हा मुद्दा इथे येथ नाही. जाहीरपणे आम्ही सगळ्यांना आंमत्रित केले आहे. जे प्रमुख नेते येणार आहेत, ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यांची संपूर्ण व्यवस्था केली जाईल. प्रत्येकाला आमंत्रण देणे शक्य नाही, त्यामुळे ठाकरे बंधुंचे हेच आमंत्रण स्विकारून मराठी माणसांनी आणि नेत्यांनी उपस्थित रहावं.

ठाकरे एकच आहे आणि तुम्ही त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करताय. ही तुमच्या मनातली भिती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वारंवार दाखवलं आहे. विकतची गर्दी ही ठाकरेंना आणावी लागत नाही. मग ते बाळासाहेब ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील. भाजपने पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आहे. आणि ठाकरेंनी ती परंपरा मोडून काढली असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

भाजपने महाराष्ट्राचे कोणते हित केले याची यादी द्यावी. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, या कोणते महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केले पाहिजे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी निवडणूक आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकलं करायला लावली. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्र धर्म मानणारा पक्ष होता. त्याचे तुम्ही लचके तोडले. यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदालावी लागेल.

समित्या समित्या खेळणं हा फडणवीसांचा आवडता छंद आहे. ठराव ठराव खेळणं मग डराव डराव करणं. एसआयटी स्थापन करणं आणि त्यातून काहीही न करणं हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही. नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ नक्कीच आहेत, ते रिझर्व्ह बँकेत होते. शालेय शिक्षण संदर्भात त्यांनी लेखन केले आहे. शालेय शिक्षण संदर्भात एक वेगळी समिती स्थापन करता आली असती, पण त्या समितीचीही आता गरज नाही. त्रिभाषा सुत्र आम्हाला नको हे आम्ही ठरवलं आहे, नाही म्हणजे नाही. हे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही ठणकावून सांगितले आहे. त्रिभाषा सुत्र आम्ही स्विकारणार नाही, कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तेव्हा या समित्या वेळ आणि सरकारी तिजोरीतले पैसे ही वाया घालवणारी व्यवस्था आहे.

पंतप्रधान मोदींना सांगा की या देशातल्या सर्व इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून घेऊन येत आहात त्या बंद करून टाका. संघाचीही मागणी आहेच. एक जीआर काढा, तुम्हीला जीआर काढण्याची खुप हौस आहे. महाराष्ट्रात तरी हा जीआर काढा. महाराष्ट्रात ज्या इंटरनॅशनलच्या छत्र्या उघडलेल्या आहेत जो धंदा आहे. हा धंदा तुमचेच लोक करत आहेत, शिक्षण सम्राट म्हणून त्यांचे धंदे बंद करा. आम्ही आमचं बघून घेऊ.

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा तुमचाच बाप प्रयत्न करतोय. मुंबई कमजोर करण्याची, मुंबई लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याची आणि मुंबई हळू हळू कमजोर करून तोडण्याची ही तुमची हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले बाप आहेत मिस्टर फडणवीस तेच करत आहेत. चोराच्या मनात चांदणं. फडणवीसांना मुंबई ही स्वप्नात दिसते, कारण त्यांनी ही मुंबई तोडायची आहे असा त्यांच्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा दबाव आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीने अदानीच्या घशात धारावी सह अर्धी मुंबई घातली आहे ना ती घातली नसती. धारावीचा विकास मराठी उद्योजकालाही करता आला असता. आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस, गिरणी कामगार, मराठी माणूस यांनाही घरं देऊन एक वसाहत उभी करता आली असती.

सुनील शेळके यांचे प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष त्यांचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्राची लूट करत आहेत. काल संजय शिरसाटांचा काय विषय होता? त्यानंतर भुमरेंनी दीडशे कोटी रुपयांची जमीन भेट दिली. आणि मावळचे आमदार शेळके यांनी हजारो कोटी रुपायंची रॉयल्टी MIDC च्या जमिनीवरती बेकायदेशीररित्या खाण उद्योग सुरू करून बुडवली. याबाबत मी सविस्तर तपशील पुराव्यासह त्यांना मी पाठवलेली आहे. मी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या सहकाऱ्यांची भ्रष्टाचाराची 21 प्रकरणं पाठवली आहेत. पूर्ण 50 झाली की मी पत्रकार परिषद घेईन. एकाही पत्राची त्यांनी पोच दिलेली नाही, काय कारवाई केली हे ही सांगितले नाही. 25 वर्ष असेलेला एक खासदार भ्रष्टाचारसंबंधी पत्र पाठवतो, तुम्ही काय महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करताय. काय थुंकी लावताय महाराष्ट्राला. मी एकूण 50 पत्र पाठवली आणि एकत्र पत्रकार परिषद घेईन. आणि विचारेन त्या 50 पत्रांचं काय झालं? ही नौटंकी नाही महाराष्ट्रा कसा लुटला जातोय, सरकारला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल. प्रत्येक ठिकाणी लूट सुरू आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.