देवा भाऊ ‘सुपरफास्ट’, मग शिंदे सुपर स्लो? सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री गायब, काँग्रेसच्या कानपिचक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा प्रकारची जाहिरात काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात छापण्यात आली होती. यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. भाजप नेत्यांनी तीव्र शब्दामध्ये शिंदे गटाला सुनावले होते. आता याचे उट्टे भाजपने काढले
आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन वर्ष झाले. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जाहिराबाजीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलेले नाही. यावरून काँग्रेसने कानपिचक्या दिल्या आहेत.

हे देखील वाचा – एकनाथ शिंदेची बेडकाशी तुलना, जाहिरातीवरून भाजप खासदाराचा थेट इशारा

काय आहे जाहिरात?

सरकारला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त भाजपच्या वतिने जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच गायब आहेत. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असून वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो आहे.

फडणवीसांपेक्षा शिंदे वरचढ, मिंधे गटाचा दावा; पानभर जाहिरातीतून देवेंद्र गायब

काँग्रेसच्या कानपिचक्या

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही जाहिरात ट्विट करून कानपिचक्या दिल्या आहेत. ‘देवा भाऊ सुपरफास्ट? शिंदे कुठे गेले? ते सुपर स्लो का? पिक्चर इधर भी बाकी है मेरे दोस्त…” असं ट्वीट केलं आहे.

जाहिरातीनंतर डॅमेज कंट्रोल

शिंदे गटाकडून राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा प्रकारचा संदेश देणारी जाहिरात देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असा दावा एका सर्वेक्षणाच्या आधारे या जाहिरातीतून करण्यात आला होता. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्था पसरली होती. उपमुख्यमंत्री फडणवीसही नाराज झाल्याची चर्चा होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाने वेगळी जाहिरात प्रकाशित करून डॅमेज कन्ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणावर फडणवीस यांनी स्वतः प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला. ही जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असे शिंदे म्हणाले, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

“भाजपनं त्याग केला म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले”, जाहिरातीवरून प्रवीण दरेकरांनी मिंध्यांना सुनावले