आमचा संवाद नीट चाललाय; एकत्रितपणे निवडणूक लढवू! मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

667

‘विधानसभा निवडणुकीत युती होण्याबाबत शिवसेना-भाजपचा संवाद नीट चालला आहे. आमचा संवाद कन्क्लुजनला जाईल आणि आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाजनादेश यात्रे’निमित्त कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असे बोलले जात होते. मात्र, ते उपस्थित नव्हते, याबाबत यावेळी विचारण्यात आले. त्यावर ‘कुठलेच पंतप्रधान हे राजकीय प्रवेशाला उपस्थित राहत नाहीत. तो प्रोटोकॉल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजेंना माझ्याकडे या किंवा नाशिकला महाजनादेश यात्रेच्या समारोपला येणार आहे तेव्हा भेट घेणे शक्य असल्याचे सांगितले आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. मोठय़ा नेत्यांनी विधाने करताना हिंदुस्थानला फायदा होतोय की पाकिस्तानला, याचा विचार केला पाहिजे. राहुल गांधी यांनीही असेच विधान केले होते. त्याचा फायदा पाकिस्तानने उचलला होता. त्यामुळे अशी विधाने केली जाऊ नयेत. हिंदुस्थानातील मुस्लिम हे राष्ट्राभिमान राखून आहेत. त्यामुळे पवार अशी विधाने करून मुस्लिम मते वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावरून राष्ट्रवादी पक्षाची मानसिकता दिसून येते,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उदयनराजे मुक्त विद्यापीठ
उदयनराजे भोसले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांच्या भाजपप्रवेशावरून अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले. त्याबरोबरच दैनिक ‘सामना’तील सोमवारच्या अग्रलेखाचा हवाला देऊन प्रश्न विचारताच मुख्यमंत्री म्हणाले, ‘उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहेत. जेथे शिस्त आहे, तेथे ते शिस्तीत राहतात. जेथे जनतेला आवडते, तेथे तसे करतात,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या