अयोध्येत जंगी स्वागत; उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले रामलल्लांचे दर्शन

1159

महेश कुलकर्णी

‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा मंत्रभारल्या भक्तिमय वातावरणात शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रामलल्लांचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शनिवारी सकाळी विशेष विमानाने लखनौला आगमन झाले. विमानतळावर आगमन होताच ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’चा महागजर झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा काफिला अयोध्येकडे मार्गस्थ झाला. लखनौ ते अयोध्या हा संपूर्ण मार्ग भगवाच झाला होता. गावागावांत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले.

ढोलताशांचा गजर, आतषबाजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काफिला अयोध्येत दाखल होताच ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱयातून आलेल्या शिवसैनिकांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला.

भक्तिमय वातावरणात रामलल्लांचे दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात रामलल्लांचे दर्शन घेतले. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, संजय राठोड, खासदार गजानन कीर्तिकर, कृपाल तुमाने, अरविंद सावंत, राजन विचारे, हेमंत पाटील, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, आमदार अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, बंडू ओक, माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, नारायण कानकाटे आदींची उपस्थिती होती.

उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांकडून भव्य सत्कार
उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 51 किलोंचा पुष्पहार घालून भव्य सत्कार केला. यावेळी त्यांना प्रभू रामचंद्रांची देखणी प्रतिमाही भेट देण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे राज्यप्रमुख अमिलसिंह, संघटक विजय शुक्ला, उपप्रमुख अभय दुबे, आनंद विक्रमसिंग, वीरेंद्र वर्मा, संजीव तिवारी, विश्वजितसिंह, शिवकुमार विश्वकर्मा, संतराम यादव, रजत पांडे, कुमारशंकर शर्मा, अतुल मिश्रा, फुरकान खान आदींची उपस्थिती होती.

भगव्या तेजाने अयोध्या तळपली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येशी भावनिक नाते होते. त्यांचा मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला याचा अयोध्यावासीयांना अपूर्व आनंद झाला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाच्या निमित्ताने अयोध्या भगव्या तेजाने तळपली! शहरातील चौक, बाजारपेठेतही उद्धव ठाकरे यांच्याच दौऱयाची चर्चा होती.

आपली प्रतिक्रिया द्या