
मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. ‘कारण नसताना उगाच पुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणे हे कुणालाच आवडणार नाही. मात्र लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा. मास्क घाला, हात धुवा, शारीरिक अंतर राखा आणि लॉकडाऊन टाळा’, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ असेही बजावले.
आज सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुकीवर तसेच मोर्चे यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेनंतर आता ‘मी जबाबदार’ ही मोहीम राबवली जाईल आणि मंगळवारपासून सर्व शासकीय कार्यक्रम ऑनलाइन होतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करायचा का? असा थेट सवाल राज्यातील जनतेला केला. येत्या आठ दिवसांत याचे उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. ज्यांना लॉकडाऊन नको असेल ते मास्क घालणे, अंतर राखणे, हात धुणे या सूचना पाळतील. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विनामास्क फिरतील, असे बजावतानाच आता ‘मीच जबाबदार’ ही मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे कौतुक
माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी नितीन राऊत यांनी सपत्नीक येऊन आग्रहाने लग्नाचे आमंत्रण दिले होते. आज कोरोना वाढतोय म्हणून त्यांनी मुलाचा लग्न सोहळा रद्द केला. याला म्हणतात सामाजिक जाणीव. नितीनजी, मी तुमच्या मुलाला माझ्या आणि जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो. आपण दाखविलेली सामाजिक जाणीव सर्व दाखवतील ही अपेक्षा करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
पक्ष वाढवूया, पण कोरोना नको वाढवूया!
पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे. मला व माझ्या सहकारी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण पक्ष वाढवूया, कोरोना नको वाढवूया, असे सांगतानाच या युद्धात आपल्याला एकत्र राहावे लागेल. जर आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊन कडक पद्धतीने करावा लागेल. ही सूचना मी नाही तर कोरोना आपल्याला देतोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
बँक्वेट हॉलमध्ये नियमावली मोडली तर कारवाई
लग्न समारंभ सुरू झाले, मंडया उघडल्या, थिएटर्स सुरू झाले. लग्न समारंभासाठी हॉटेल्समध्ये बँक्वेट हॉल आहेत. तिथेसुद्धा नियमावली कडक केली आहे. पुठेही सूट देऊन चालणार नाही. समजा त्या हॉलमध्ये जर का नियमावली मोडली गेली असे दिसले तर त्या मालकावर कारवाई करणार. सार्वजनिक ठिकाणी जर विनामास्क आढळले तर त्यांना दंड करायला सुरुवात केली आहे. याचे कारण आपण पूर्वी ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली होती, पण तेव्हा लॉकडाऊन होता. आता आपण सर्व उघडलं आहे. हेतू हा होता की कोरोनाचे संकट ओसरले असेल तर थोडा पुन्हा मोकळा श्वास घेणे आणि बंद पडलेले अर्थचक्र सुरू करणे. दुर्दैवाने अर्थचक्र फिरायला लागले आणि आता पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. आता लॉकडाऊन करायचा का? जर लॉकडाऊन नको असेल, सर्व गोष्टी आपल्याला सुरू हव्यात तर त्या सुरू करताना शिस्तीची गरज आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बजावले.
दुसरी लाट आलीय की नाही हे येत्या 15 दिवसांत कळेल
15 दिवसांपूर्वी ‘कोरोना गया’ अशी राज्यात परिस्थिती होती. मात्र आज राज्यात एकाच दिवसात सुमारे सात हजार रुग्ण आढळत आहेत. जेवढे आपण दोन हजारांपर्यंत खाली गेलो होतो तेवढी आता रुग्णसंख्या वाढत आहे. अमरावतीमध्ये त्यावेळी जी सर्वाधिक रुग्णसंख्या होती त्या रुग्णसंख्येच्या आसपास आताची रुग्णसंख्या पोहोचली आहे. आज हजाराच्या आसपास तिथे रुग्ण आहेत. ही परिस्थिती वाईट आहे. आज आपण गलथानपणा केला तर हे चित्र किती भयानक होईल, आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडेल. ही परिस्थिती आपण पाहिली तर दुसरी लाट आलीय का? तर दुसरी लाट दरवाजावर धडका जरूर मारत आहे. आत आली आहे की नाही ते येत्या 8 ते 15 दिवसांत कळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
– कोरोना योद्धे झालात नाही तरी कोरोनाचे दूत होऊ नका!
कोरोना योद्धय़ांचा आपण आज सत्कार करतो, पण ते करताना आपण एक सामाजिक भान राखायला हवे. कोरोनाची परिस्थिती अशीच नियंत्रणात आली नव्हती. ती नियंत्रणात आली ती तुमच्या सहकार्याने आणि कोरोना योद्धय़ांनी केलेल्या मेहनतीने. कोरोनाशी लढताना जे योद्धे शहीद झाले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोरोना योद्धय़ांचे सत्कार अनेक ठिकाणी होतात. चांगले आहे, पण आपण कोरोनाचे योद्धे नाही झालो तरी कोरोना दूत व्हायचे नाही, हे लक्षात ठेवा. सत्कार करताना सामाजिक जाणीवही असू दे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
– उद्या सायंकाळपासून कडक निर्बंध
पुन्हा एकदा काही प्रमाणात बंधने पाळावी लागणार आहेत. अमरावती, अकोला, यवतामाळ, वाशीम या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात कोरोनात वाढ होत आहे. तिथे उद्या सायंकाळपासून निर्बंध घालण्याचे आदेश तिथल्या अधिकाऱयांना दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
उद्यापासून शासकीय कार्यक्रम झूम मिटिंगवर
आपण विकास थांबवला नाही, विकासाची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गाची प्रगती मी पाहून आलो, गोसीखुर्द, लोणार, जव्हार इथे गेलो होतो. भूमिपूजनं व उद्घाटनांची सुरुवात केली. कलानगरच्या उड्डाणपुलाची सुरुवात करून आलो. आता हे कार्यक्रम आटोपते घ्यावे लागणार आहेत. आज रायगडमध्ये एक कार्यक्रम आहे तिथेसुद्धा कमीत कमी लोकांची उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता गर्दी करू नका असे सांगितले आहे. मंगळवारपासून शासकीय कार्यक्रम पुन्हा ऑनलाइन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजपासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका, मोर्चे, गर्दी करणारी आंदोलने, मोठय़ा यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी घालत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘‘मी जबाबदार’ मोहीम यशस्वी करा
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम घराघरामध्ये राबवत होतो. तेव्हा आपण सर्व घरात होतात. घराघरात आपले सर्व आरोग्य कर्मचारी येऊन आपली विचारपूस करीत होते. ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघड आहे. कारण आता तुम्ही सर्व घराबाहेर आहात. तेव्हा एका यंत्रणेवर किती ताण टाकायचा. लॉकडाऊन करावे लागेल म्हणताच काही जण सल्ला देतात टेस्टिंग वाढवा. टेस्टिंगपण वाढवले आहे. पण एका यंत्रणेवर ताण टाकायचा आणि आपण बेभान वागायचे हा त्या यंत्रणेशी केलेला अमानुषपणा आहे. आपण सगळीच माणसे आहोत, सगळ्यांना आपलं आयुष्य हवं आहे. मला असं वाटतं ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशीच एक नवीन मोहीम राबविली पाहिजे. ती म्हणजे ‘मी जबाबदार आहे.’ होय प्रत्येकाने सांगायचं आहे मीच जबाबदार. ही जी आपली बंधनं आहेत ती घराबाहेर पडताना मास्क घालेनच, हात धुणारच, अंतर ठेवणार हे आपण कटाक्षाने पाळायला हवे. काल नीती आयोगाच्या बैठकीत एक सूचना केली त्यानुसार ऑफिसच्या वेळा विभागल्या, काही जणांनी वर्क फ्रॉम होम केलं तर कारण नसताना ट्रेनमध्ये, बसमध्ये, कामाच्या ठिकाणी जी गर्दी होते ती गर्दी नियंत्रित करता येईल. त्याचप्रमाणे ज्या महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत त्या पाळा. त्यानुसार आपण ‘मी जबाबदार’ ही नवीन मोहीम यशस्वीपणे राबवाल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
जनतेला विनंती… कोविडयोद्धा नाही झालात तरी चालेल पण कोविडदूत मात्र होऊ नका. राजकीय पक्षांना विनंती… आपण आपापला पक्ष वाढवूया, पण कोरोना वाढवूया नको!
दुसरी लाट दरवाजावर धडका मारतेय!
कोरोनाची दुसरी लाट दारावर धडका देत आहे. ती आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ-पंधरा दिवसांत कळेल. मात्र आता थोडेसे आपल्यावर बंधने आणणे गरजेचे आहे. ब्रिटन, ब्राझील, पुवेतसह अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावे लागले. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा इलाज असेल, नसेल… पण संसर्गाची साखळी तोडायची तर संपर्प थांबवणे हाच त्यावरचा उपाय आहे. या सर्व गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. पण आपल्याला आवडत नाही म्हणून कोरोना आपल्याला सूट देणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले.





























































