
आपण विकास करताना झाडांची कत्तल करतो आणि विकास झाल्यानंतर रस्त्यांवर ऑक्सिजन मिळविण्यासाठी यंत्राचा वापर करतो. त्यामुळे पर्यावरणाचे जतन व संवर्धन हा सरकारी उपक्रम न राहता प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. माझी वसुंधरा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत माझी वसुंधरा ई-शपथ (ई-प्लेज) उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ झाला. राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटिबद्ध राहीन, अशी मुख्यमंत्र्यांनी या वेळी शपथ घेतली.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. राज्यातील सर्व www.majhivasundhara.in या वेबसाईटला भेट देऊन #EPledge या मेनूवर क्लिक करून ई-शपथ (ई-प्लेज) घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
दोन इमारतींमधून उगवणारा सूर्य
पर्यावरणाच्या होणाऱया ऱहासाबद्दलचे उदाहरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी आम्ही चित्रकला स्पर्धा घेत असू तेव्हा उगवणाऱया सूर्याचे चित्र काढत असताना अनेक मुले दोन डोंगरांमधून उगवणाऱया सूर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींच्या मधून उगवणाऱया सूर्याचे काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी जपणूक करण्याची आपल्या सर्वांची आता मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
पर्यावरण संवर्धन
नव्या वर्षाची सुरुवात कशी करावी याची एक नवीन वाट पर्यावरणाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन या कार्यक्रमातून दिली गेली आहे. या अभियानातून फक्त देशालाच नव्हे तर जगालाही पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल. कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदूषणात मोठी घट झाली होती. विकासातला हा असमतोल दूर करून पर्यावरणपुरक अशा शाश्वत विकासाची कास आपल्याला धरावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यावरणपूरक शाश्वत विकास
पर्यावरणाच्या ऱहासाबद्दल चिंता व्यक्त करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे विविध वादळे, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी विविध संकटे येत आहेत. याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. राज्यात मागील वर्षभरात अशा विविध आपत्तीग्रस्तांना सुमारे साडेतेरा हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण अशी संकटे रोखण्यासाठी आता आपल्याला व्यापक प्रयत्न करावे लागतील. यासाठीच विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधत पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा ध्यास राज्याने घेतला आहे. आरेची जमीन संरक्षित करणे, 10 संरक्षित वनांची घोषणा, हजारो एकर क्षेत्राचे कांदळवन जाहीर करणे असे विविध निर्णय घेतले जात आहेत. समृद्धी महामार्गाचा पर्यावरणपूरक विकास करण्याला चालना देण्यात येत आहे. आता या चळवळीत सर्वांनी सहभागी होत ई-शपथेच्या माध्यमातून योगदान द्यावे आणि पर्यावरण रक्षणाचा किमान एक संकल्प करून तो कायम आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.





























































