सिरम इस्टिटय़ूटच्या प्लाण्टला आग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने दखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदारांसोबत बैठक सुरू असतानाच पुण्यातील सिरम इस्टिटय़ूटच्या प्लाण्टला आग लागल्याचे वृत्त आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आगीची तत्काळ दखल घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीविषयीची सर्व माहिती घेतल्यानंतर यासंदर्भात पत्रकार परिषदही घेतली. यावेळी आगीविषयीची परिस्थिती सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही आग कोरोना लसीच्या युनिटला लागलेली नसल्याचेही सांगितले. यावेळी आग विझविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱया अग्निशमन दलाविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून मोलाची कामगिरी करण्यात आली. वित्तहानी आणि जीवितहानी टाळण्यासाठी हे जवान आपल्या जीवाचीही परवा करीत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विरोधकांना संयमाची लस टोचण्याची गरज आहे

सिरमच्या आगीवरून राजकारण विरोधकांकडून सुरू झालं आहे. घातपाताची शक्यता वर्तविली जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता. त्यांच्याकडे नेमकी माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक किंवा आणखी काही असेल ही सर्व माहिती त्यांच्याकडे कशी जाते, हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. त्यांना काही विद्या वगैरे अवगत असेल आणि जर त्यांच्याकडे काही माहिती असेल तर ती त्यांनी जरूर द्यावी. त्यांना संयमाची लस टोचण्याची गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

आगीच्या सखोल चौकशीचे आदेश

सिरम इन्स्टिटयूट प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत देशातून आणि देशाबाहेरूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सिरम इन्स्टिटयूटला लागलेल्या आगीच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत अशी महिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आज सिरमला भेट देणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी सिरम इन्स्टिटय़ूटचे अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली. उद्या शुक्रवारी 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे सिरम इन्स्टिटय़ूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या