
हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खणखणीत भाषण करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक भारूड म्हणून दाखवत ‘महाराष्ट्र विकास आघाडी’वर टीका केली होती. त्याला उत्तर देताना संत ज्ञानेश्वरांच्या रचनेचा आधार घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारला चोख प्रत्युत्तर दिलं.
‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’, असा प्रश्न काल फडणवीसांनी विधानसभेत विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ‘दिलेल्या शब्दाचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं?’ असा प्रतिप्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला.
‘वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन’, असं म्हणतानाच ‘भाजपाची पालखी कायम वाहणार नाही, हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता’, याची आठवण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली.
‘मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सुरू असलेले संसार भाजपाने मोडले, लालू आणि नितीश यांची युती तुम्हीच तोडलीत’, असे सांगताना सत्तेसाठी भाजपने केलेल खेळ सभागृहात मांडले.
वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेला वारंवार लक्ष्य करण्यात येत होतं. त्यावर उत्तर देताना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ‘सावरकरांचे संपूर्ण हिंदुत्व भाजपला मान्य आहे का? सावरकरांचे गायीबद्दलचे विचार मान्य आहेत का?’ असे भाजपला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले.
सीमाभागातील मराठी बांधव, ते ही हिंदुच आहेत असे सांगत ते आक्रोश करत असताना, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? गेल्या पाच वर्षांत केंद्राने कर्नाटकाचीच बाजू घेतल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं.
महाविकासआघाडीच्या सरकारला तीन चाकांच रिक्षावालं सरकार अशा शब्दात फडणवीस यांनी हिणवलं होतं. त्याला उत्तर देताना ‘हो रिक्षावालंच सरकार आहे. गरिबांना बुलेट ट्रेन कदाचित परवडणार नाही, पण तीन चाकी रिक्षाच परवडेल’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

























































