मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप

909

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्रातील पदकविजेत्यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्पर्धा संपल्या की सर्व घरी जातात, पण त्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया खेळाडूंचे कौतुक कोण करणार? पुरस्कार मिळत नसतो. तो मिळवावा लागतो. तो तुम्ही मिळवलात. अटकेपार झेंडा रोवणाऱया तुम्हा सर्वांनाच मानाचा मुजरा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पुण्याचे क्रीडा संघटक पंढरीनाथ पठारे यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिल्या जाणाऱया या पुरस्कार सोहळ्यात 63 खेळाडूंना गौरविण्यात आले. याप्रसंगी गुवाहाटी येथे झालेल्या ‘खेलो इंडिया गेम्स’मधील पदकविजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया या मान्यवरांची उपस्थिती होती.

बंदिस्त नाही, तर आमचे सर्वच भव्यदिव्य
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडून पुरस्कार सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले. सुनील केदार यांच्याकडून हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात येईल याचा विश्वास होता. आम्ही हा सोहळा बंदिस्त हॉलमध्ये करू शकलो असतो, पण आमचे सर्व काही भव्यदिव्य असते. म्हणूनच गेट वे ऑफ इंडिया येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला.

जनसंपत्तीकडेही लक्ष द्यायला हवे
हिंदुस्थान जगात आर्थिक ताकद बनण्याचे लक्ष्य बाळगत आहे. याचप्रसंगी जनसंपत्ती म्हणजेच खेळ व खेळाडूंकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

3.25 कोटींची बक्षिसे
‘खेलो इंडिया गेम्स’मधील पदकविजेत्यांना 3.25 कोटींची बक्षिसे देण्यात आली. यामध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख, रौप्य पदक विजेत्यांना 75 हजार व कास्य पदक विजेत्यांना 50 हजार रुपये देण्यात आले.

‘गोगर्ल’चा शुभारंभ
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘गोगर्ल’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक महिला दिनी या योजनेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांच्या फिटनेससाठी या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

– हा पुरस्कार सोहळा सुरू होण्याआधी शिवराज्याभिषेकाचा देखणा कार्यक्रम पार पडला. ते बघत असताना तो काळ डोळ्यांसमोर उभा राहिला. याचसोबत आणखी एक गोष्ट जाणवली. त्या काळातही घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या खेळांशी निगडित असलेल्या गोष्टी होत होत्या.

– शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने मोगलाईत सैतानी ताकदीचा चेंदामेंदा केला. मध्यरात्रीच्या काळोखात कोंढाणा किल्ला सर केला. शिवरायांचे मावळे काटक होते. शूर होते. आताच्या युवकांनीही शारीरिक संपदा कमवायला हवी.

– सध्याच्या काळात इनडोअर गेम्स जास्त खेळले जाताहेत. मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. युवकांनी सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येकाचे वेगळे महत्त्व असते. ऑलिम्पिकमध्ये आजही आपल्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पदक तालिकेत आपल्याला आपला देश शोधावा लागतो. त्यामुळे मैदानी खेळांमध्येही ठसा उमटवायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या